1 जानेवारी 2020 ते 15 जुलै 2021 पर्यंत नोंदणी केलेल्यांना मिळणार लाभ ः 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची मुदत
प्रतिनिधी/कोल्हापूर
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानवविकास विकास संस्था अर्थात `सारथी’ने एम. फील आणि पीएच. डी.साठी नोंदणी केलेल्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजातील नॉनक्रिमिलेयर (वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रूपये) उमेदवारांसाठी फेलोशिप (अधिछात्रवृत्ती) योजना जाहीर केली आहे. 1 जानेवारी 2020 ते 15 जुलै 2021 या कालावधीत एम. फील, पीएच. डीसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना या छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीचा (सीएसएमएनआरएफ) लाभ मिळणार आहे.
या संदर्भात `सारथी’च्या https://sarthi-maharashtragov.in संकेतस्थळावर सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या स्वाक्षरीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मानव्यशास्त्र, सामाजिक शास्त्र, विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यामध्ये संशोधन करणाऱया उमेदवारांना फेलोशिपचा लाभ मिळणार आहे. एम. फील ची नोंदणी केलेल्या उमेदवारांना दोन वर्षांसाठी दरमहा 31हजार रूपये फेलोशिप मिळणार आहे. पीएच. डीची नोंदणी केलेल्या उमेदवारांना पहिली दोन वर्षे दरमहा 31 हजार रूपये तर पुढील तीन वर्षे प्रतिमहा 35 हजार रूपये फेलोशिप मिळणार आहे. त्याचबरोबर अकस्मितता खर्चासाठी वार्षिक रक्कम मिळणार आहे. दिव्यांग, अंध उमेदवारांसाठी दहामहा दोनहजार रूपयांची रक्कम स्वतंत्रपणे दिली जाणार आहे. शासनाच्या नियमानुसार एचआरए देखील मिळणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत वर दिलेली `सारथी’ची लिंक सुरू राहणार असून त्यावर अर्ज भरण्याबरोबर इतर सूचना, माहिती दिली आहे. त्यानुसार पात्र लाभार्थी उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन सारथीचे व्यवस्थाकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.
फेलोशिप मिळण्यासाठी पात्रता, निकष
– उमेदवार मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजातील हवा, सक्षम यंत्रणेकडून दिलेले जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक,
-महाराष्ट्राचा अधिवास असलेले प्रमाणपत्र आवश्यक (डोमेसाईल सर्टिफिकेट)
-एम. फील, पीएच. डीसाठी नोंदणी पेलेली असणे आवश्यक.
-1 जानेवारी 2020 नंतर एम.फील, पीएच. डीसाठी नेंदणी केलेले उमेदवार पात्र ठरतील. त्यापूर्वीची नेंदणी केलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-उमादवार नॉनक्रिमिलेअर असणे आवश्यक, त्याच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असणे आवश्यक, तसा दाखला सादर करणे अनिवार्य.
-अर्जदार उमेदवाराचे वय 15 जुलै 2021 पर्यंत 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
-उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करावा, त्यासाठी सारथीच्या संकेतस्थळावर अधिक माहिती पाहावी.