फ्लॅट, बंगला फोडला : आठ लाखाचे दागिने लंपास : नाकाबंदी करूनही चोरटे पसार
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी शहरात खासकीलवाडा व न्यू गरड या मुंबई-गोवा हायवेलगतच्या वस्त्यांमध्ये शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एक बंगला व एका फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून तब्बल आठ लाख रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. दोन्ही ठिकाणी चोरीची पद्धत सारखीच होती. त्यामुळे दोन्ही ठिकाणी चोरटे तेच असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस ठाण्यापासून अवघ्या अर्ध्या कि. मी. परिसरात या चोरीच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
खासकीलवाडा जेलच्या पाठीमागील बाजूला भरवस्तीत भरत गवस यांचा बंगला आहे, तर गरड येथे रस्त्यालगतच महालक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये आनंद देसाई (रा. भेडशी) यांचा फ्लॅट आहे. या दोन्ही ठिकाणचे कुटुंबीय सावंतवाडी बाजारपेठेत गेले असता चोरटय़ांनी संधी साधली. दोघे अनोळखी हेल्मेटधारक तरुण पल्सर मोटारसायकलसह गरड परिसरात 11 वाजता नागरिकांनी पाहिले होते. ओरोस येथील श्वानपथकही नंतर आणण्यात आले. तसेच घटनास्थळीचे हातांचे ठसेही पोलिसांनी घेतले आहेत. श्वान दोन्ही ठिकाणी त्याच ठिकाणी घुटमळले.
कॉम्प्लेक्समधील फ्लॅट फोडला
सावंतवाडीतील जुन्या मुंबई-गोवा हायवेलगत न्यू गरड येथे पोलीस ठाण्यापासून अगदी काही अंतरावर रस्त्यालगत महालक्ष्मी कॉम्प्लेस आहे. या कॉम्प्लेक्समधील दुसऱया मजल्यावर आनंद देसाई (रा. भेडशी) राहतात. त्यांच्या पत्नी अनुष्का देसाई या घरी असतात. पती भेडशी येथे गेले होते, तर पत्नी अनुष्का या सव्वाअकरा वाजता मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी 22 हजाराची रक्कम कपाटात ठेवली होती. अनुष्का या शाळेत गेल्या असता चोरटय़ांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडले. बेडरुममधील कपाट फोडून आतील रोख 22 हजार रुपये, सोन्याची दोन मंगळसूत्रे, दोन अंगठय़ा, चेन असा दागिन्यांचा डबाच चोरटय़ांनी लंपास केला. अनुष्का देसाई अवघ्या दहा/पंधरा मिनिटात घरी परतल्या. त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडता दिसताच त्यांनी बाजूच्या नागरिकांना कल्पना दिली व पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तोडलेले कुलूप टाकले टेरेसवर
फ्लॅटचे तोडलेले कुलूप चोरटय़ांनी इमारतीच्या टेरेसलगत नेऊन ठेवले होते. या इमारतीत मोजकेच फ्लॅटधारक राहतात. सौ. देसाई यांच्या फ्लॅटलगतचे अन्य फ्लॅट बंद आहेत. खालच्या मजल्यावर दोघेजण राहतात, पण त्यांना या घटनेची कल्पनाही नव्हती. चोरटय़ाने या भागाची टेहाळणी करूनच चोरी केली असावी, असा अंदाज आहे.
खासकीलवाडय़ात बंगला फोडला
गरड येथून अवघ्या एक कि. मी. अंतरावर खासकीलवाडय़ात जेलच्या पाठीमागे तिलारी पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी भरत गवस यांचा बंगला आहे. ते व त्यांची पत्नी दोघेजण या बंगल्यात राहतात. हा परिसरही नेहमीच वर्दळीचा असतो. भरत गवस यांची पत्नी भक्ती सावंतवाडी कुटीर रुग्णालयात नर्स म्हणून दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्या आहेत. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भक्ती या पोस्टात कामासाठी गेल्या होत्या, तर भरत गवस हे कामासाठी तिलारी कॉलनीतील पाटबंधारे विभागात ऑफिसमध्ये गेले होते. चोरटय़ांनी बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तळमजल्यावरील बेडरुमचे कपाट उघडलेले होते तसेच अन्य सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. तेथे काहीच सापडले नाही म्हणून चोरटय़ांनी दुसऱया मजल्यावरील बेडरुममधील कपाट उघडले. तेथेही काहीच सापडले नाही. त्यानंतर चोरटय़ांनी तळमजल्यावरील देवघराकडील कपाट फोडले. त्यातील सोन्याचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले. तसेच 15 हजार रुपये लंपास केले. दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास पोस्टातील काम आटोपून भक्ती गवस घरी आल्या असता त्यांना बंगल्याचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी तात्काळ पती भरत गवस यांना मोबाईलवर संपर्क साधून माहिती दिली. घरातील सर्व सामान चोरटय़ांनी अस्ताव्यस्त फेकले होते. देवघरातील कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, हार, चेन, अंगठी असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज, तर रोख 15 हजार रुपये चोरटय़ांनी लंपास केल्याची तक्रार सौ. गवस यांनी पोलीस ठाण्यात दिली.
नाकाबंदी, मात्र चोरटे लंपास
पोलिसांना चोरीची माहिती मिळताच सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. पण चोरटे काही हाती लागले नाहीत. पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, पोलीस अधिकारी अण्णासाहेब बाबर, सय्यद यांनी तपास यंत्रणा राबविली.
वर्षभरापूर्वीही चोरी
या कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावर एका फ्लॅटमध्ये वर्षभरापूर्वी अशीच चोरी झाली होती. त्यावेळी बाजूच्या फ्लॅटमधील एका महिलेला कुलूप बंद करून ठेवले होते.
कुत्र्याला केले बेशुद्ध?
भरत गवस यांच्या बंगल्याच्या गेटसमोरच त्यांचा कुत्रा होता. त्याला चोरटय़ांनी बेशुद्ध केले असावे. कारण पंधरा मिनिटांपूर्वीच हा कुत्रा भुंकत होता. परंतु चोरटे पसार झाल्यानंतर हा कुत्रा निपचित पडून होता. सायंकाळी उशिरापर्यंत त्याची स्थिती जैसे थे होती.