महिला कृषी सहाय्यकांनी मांडली व्यथा
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुका कृषी कार्यालयात गेले महिनाभर कार्यरत असलेल्या एका कृषी पर्यवेक्षकाकडून तालुक्यातील महिला कृषी सहाय्यकना विनाकारण मानसिक त्रास देण्याबरोबरच त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचे प्रकार सुरू आहेत त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जावी. अन्यथा काम बंद आंदोलन छेडू, असा इशारा शुक्रवारी सर्व महिला कृषी सहाय्यकांनी सभापती निकिता सावंत यांची भेट घेत दिला. दरम्यान, या गंभीर प्रकाराची सभापती सावंत यांनी तातडीने दखल घेत जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा करीत त्या कृषी सहाय्यकावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.
यावेळी उपसभापती शीतल राऊळ, माजी सभापती पंकज पेडणेकर, मानसी धुरी, सदस्य संदीप नेमळेकर आदी उपस्थित होते. यावेळी जोपर्यंत त्या कृषी पर्यवेक्षकांवर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला. सभापती सावंत यांनी गंभीर दखल घेत याप्रश्नी जिल्हा कृषी विभागाने त्या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी. अन्यथा त्यांना कार्यालयात बसू देणार नाही, अशी भूमिका घेतली. तर पंचायत समिती सदस्यांनी त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, पंकज पेडणेकर, मानसी धुरी, ज्ञानेश्वर सावंत, संदीप नेमळेकर उपस्थित होते.