पालिका कार्यालय उद्यापर्यंत बंद : संपर्कात आलेल्यांची तपासणी होणार
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी शहर व तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब व त्यांचे सहकारी, भाजपचे कार्यकर्ते बंटी पुरोहित हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे सावंतवाडी नगरपालिका शनिवार ते सोमवारपर्यंत तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसात परब यांच्या जे-जे संपर्कात आले होते, त्यांची यादी तयार करण्यात येत आहे. परब यांच्या संपर्कात अनेकजण आले होते. त्यामुळे शहरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुरुवारपासून संपर्कात आलेले राजकीय, सामाजिक कार्यकर्ते होम क्वारंटाईन झाले आहेत. परब यांच्या संपर्कात आलेल्यांची अनेकांची यादी तयार करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष जिरगे व वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मसुरकर यांनी दिली.
गेले आठ महिने सावंतवाडी तालुक्यात जवळपास 670 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 576 घरी परतले आहेत. तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. सावंतवाडी शहराची लोकसंख्या 23 हजार 500 एवढी आहे. त्यापैकी 279 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी 258 जण घरी परतले. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव घटत चालला होता. शहर व तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने चालला होता.
नगराध्यक्ष संजू परब यांनी पडवे येथील खासगी रुग्णालयात कोविड टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यांच्यासोबत असलेले भाजप कार्यकर्ते बंटी पुरोहित यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परब हे दोन आठवडय़ापूर्वी घशाच्या तपासणीसाठी मुंबईत गेले होते. शुक्रवारी त्यांना अंगदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात टेस्ट केली असता पॉझिटिव्ह आली. परब यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर प्रकृती बरी असल्याने त्यांनी होम क्वारंटाईनचा निर्णय घेतला. दोन दिवस जे-जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी काही त्रास जाणवल्यास टेस्ट करून घ्यावी, आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पालिका कार्यालय तीन दिवस बंद
मुख्याधिकारी जिरगे यांनी सांगितले की, सावंतवाडी पालिकेचे कामकाज तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण पालिका सॅनिटाईझ केली जाणार आहे. सोमवार 2 नोव्हेंबरपर्यंत कामकाज बंद राहणार आहे.
भाजप बैठकीला उपस्थिती
शुक्रवार 30 ऑक्टोबरला सावंतवाडीत भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बैठक सकाळी 11 वाजता झाली. या बैठकीला परब उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी सायंकाळी प्रकृती बरी नसल्याने टेस्ट केली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. काहींनी होम क्वारंटाईन राहणे पसंत केले आहे.
कोविड सेंटरमध्ये रुग्ण कमी
तालुक्यातील कास-शेर्ले येथे कोविड सेंटर ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आले होते. या सेंटरमध्ये सध्या सहा रुग्ण आहेत. चार दिवसांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्या सेंटरमध्ये पाच रुग्ण होते. आता एकही नाही, असे डॉ. उत्तम पाटील यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्या बऱया झाल्या आहेत. त्यानंतर आता नगराध्यक्ष परब पॉझिटिव्ह आढळले आहेत.