शिपाई, वाहनचालकांना आता पांढरा युनिफॉर्म
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी नगरपालिकेने 12 लाख रुपये खर्च करून हायड्रॉलिक शिडी आणली आहे. या शिडीचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. तसेच सावंतवाडी पालिकेतील शिपाई आणि वाहनचालकांना आता पांढऱया रंगाचा युनिफॉर्म देण्यात आला आहे. आम्ही हा बदल घडविल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी शहरातील वीज कामांसाठी अत्याधुनिक हायड्रॉलिक शिडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी लागून वेळेत दुरुस्तीचे काम होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी शहरात प्रभागवार पथदीप, हायमास्ट आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी कर्मचाऱयांना अडचणीचे ठरत होते. शिडी कणकवलीहून मागवावी लागत होती. पण आता सावंतवाडी नगरपालिकेने हायड्रॉलिक शिडी आणली आहे. ही शिडी अहमदनगर येथून प्रमोद भोर यांनी उपलब्ध करून दिली आहे. या शिडीचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक मनोज नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, बंटी पुरोहित, केतन आजगावकर उपस्थित होते.
परब म्हणाले, हायमास्ट दिवे दुरुस्त करण्यासाठी 12 मीटर उंचीपर्यंत या शिडीने चढता येणार आहे. सावंतवाडी नगरपालिकेतील सफाई कामगार, शिपाई, वाहनचालक अशा 38 जणांना युनिफॉर्म देण्यात आला आहे. गेली 40 वर्षे खाकी युनिफॉर्म होता. तो आता पांढराशुभ्र करण्यात आला आहे. प्रत्येक कर्मचाऱयाला दोन युनिफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रशासनात पारदर्शकता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.