पणजीतील चित्र, मनपाने योग्य निर्णय घेणे आवश्यक

प्रतिनिधी / पणजी
राज्यातील अनेक पुन्हा जीर्ण इमारतींवर वाढती झाडे ही एक मोठी समस्याच आहे व ही झाडे कशी तोडता येतील हा देखील एक प्रश्न अनेकांना सतावित असतो. कित्येक घराघरात कोणीही रहात नाही व घर हे भांडणाचे मुख्य केंद्र झाल्याने आपसातील वैमनस्यामुळे दुर्लक्षित झालेल्या घरांचा ताबाच मुळी झाडे घेत आहेत. किंबहूना ही घरे तथा इमारतीच झाडे गिळत असल्याचे दृष्य अनेक ठिकाणी दिसून येते.
राज्यातील विविध ग्रामीण भागात हे दृष्य सर्रासपणे दिसून येते. परंतु खुद्द राजधानी पणजी शहरात देखील असेच दृष्य दिसतेय. त्याला जबाबदार कोण ?. पणजी मनपा देखील त्यात हस्तक्षेप करीत नाही. पणजीतील काही वादात असलेल्या घरांचा ताबा भिंतीवरून वाढत आलेल्या झाडांनी घेतला आहे. दिसताना हे दृष्यही भयानक वाटावे, असेच असते. चक्क भिंतीवरून वाढत आपला पसारा पसरविणाऱया झाडांची परिस्थिती पहाता ही झाडे चक्क घरच गिळत आहे, असे दृष्य दिसून येते.

अगोदर भिंतीवर वा एखाद्या गॅलरीच्या टोकाला छोटेसे पिंपळाचे झाड जन्म घेते. ते अशा ठिकाणी तयार होते, जिथे घरात रहाणारे असो वा अन्य कोणाचाही हात तिथे पोहोचत नसतो. त्या छोटय़ाशा झाडाकडे दुर्लक्ष केले खरे. हळूहळू वर्षभरात झाड बरेच वाढू लागते. खासकरून पिंपळ किंवा तत्सम झाडे ही भिंतीवर, गॅलरीत अशा ठिकाणी वाढतात व त्याची मुळे भिंतीवरून खाली जमिनीपर्यंत येतात. तसेच भिंतीतून ती पाण्याचा शोध घेत सर्वत्र पसरतात. नंतर मुळे मोठे होतात. घराच्या भिंतीचे चिरे उचलण्यापर्यंत त्यांची मजल जाते. कैकवेळा घरांच्या भिंतीना तडे जातात. दुर्लक्षित घरांची कौले, वासे पडतात आणि झाडे उंच उंच वाढतात.
हे अशा पद्धतीचे दर्शन पणजीत घडतेय. खुद्द पणजीतील ‘सिने नॅशनल’ या बंद पडलेल्या चित्रपट गृहाची परिस्थिती अत्यंत केविलवाणी आहे. हे थिएटर जिथे उभारलेले आहे ती जागा पणजी महापालिकेची आहे. तत्कालीन पणजी पालिका व एका खासगी उद्योजकांशी झालेल्या करारानंतर काही वर्षांकरीता जागा लिजवर देऊन तिथे थिएटर उभारण्यात आले. त्या काळात पणजीतील हे सर्वात चांगले सिनेमागृह होते. या जागेचा लिज करार संपुष्टात आला. थिएटरही बंद पडले. आता थिएटर मालक व पणजी मनपा प्रकरण न्यायालयात आहे. तोपर्यंत थिएटरच्या एका बाजूने पिंपळ व अन्य प्रकारची झाडे वाढून त्याचे महारूक्षात रुपांतर होत आहे.

असेच प्रकार अन्य काही इमारतींमध्ये झालेले आहे. श्री व्यंकटेश स्तोत्रामध्ये म्हटलेले अहे काग विष्ठचे झाले पिंपळ’ कावळय़ाच्या विष्ठेतून पडलेल्या बी मधून पिंपळाचे बीजारोपण होते व त्यातून छोटय़ाशा पिंपळाच्या रोपटय़ाचे महाकाय वृक्षात रुपांतर होते. काही इमारतींवर वडाची झाडे वाढतात व त्याची मुळे पाण्याचा शोध घेत स्वच्छतागृहापर्यंत पोहोचतात. आणि नंतर जलवाहिन्यांमध्ये मुळे पोहोचतात. स्वच्छतागृहाबरोबरच पाळेमुळे सर्वत्र पसरतात व इमारतीचा ताबाच ही झाडे घेतात. जुन्या सचिवालयाच्या पाठीमागे एका छोटय़ाशा इमारतीवर काही वर्षापूर्वी छोटेसे रोपटे तयार झाले, आज त्याचे मोठय़ा वृक्षात रुपांतर झालेय. आता ही झाडे तोडली तरी त्याची पाळेमुळे सर्वत्र पसरल्याने भिंतीही वाया गेल्यात. इमारती तोडल्याशिवाय पाळेमुळे जात नाहीत. भाडेकरू ठेवलेल्या घरांचे प्रश्न तर गंभीरच. बिऱहाडकरू जाण्यास तयार नाही व घर मालकाला नवे घर यामुळे बांधता येत नाही. मालक व भाडेकरू यांच्या वादात घरे गिळण्याचे काम झाडांनी केले. पणजीतील अशीच काही घरे आता मोडकळीस आलीत. ऐन पावसाळय़ापूर्वी त्यावर इलाज केला नाही तर मोठय़ा दुर्घटनाही घडू शकतात. पणजीच्या सुंदर शहराला अशा या प्रकारांनी मात्र गालबोट लागलेले आहे. तेव्हा अशा झाडांबाबत स्मार्ट सिटी वा पणजी मनपाने निर्णय घेणे आवश्यक आहे.