वार्ताहर / कणकवली:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात गेल्या 14 दिवसांत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्हय़ाच्या ठप्प झालेल्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी व देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या पर्यटनाच्या दृष्टीने सिंधदुर्गचा ऑरेंज ऐवजी ग्रीन झोनमध्ये समावेश करण्याची मागणी आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. जिल्हय़ात कोरोनाबाबत प्रशासन व संबंधित यंत्रणा योग्यप्रकारे काम करत आहे. अशा स्थितीत जर सिंधुदुर्गचा समावेश ग्रीन झोनमध्ये केला, तर जिल्हय़ाला आवश्यक त्या सवलती मिळू शकतात, असे राणे यांनी म्हटले आहे.
ज्या ठिकाणी 10-15 रुग्ण मिळाले, तो जिल्हा ऑरेंज झोनमध्ये टाकणे योग्य आहे. मात्र, ज्या जिल्हय़ात कोरोनाचा गेल्या 14 दिवसांत एकही रुग्ण सापडलेला नाही, तेथे ग्रीन झोन लागू करून जिल्हय़ातील जनतेला सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. येत्या काळात पर्यटनाच्यादृष्टीने कोरोनाबाबत ग्रीन झोन जाहीर करण्याची गरज आहे. सिंधुदुर्गच्या बाजूचे गोवा राज्य कोरोनामुक्त जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे पर्यटनदृष्टय़ा फायदेशीर ठरणार आहे.
या बाबत जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करण्यात आली आहे. या झोनबाबत राज्य स्तरावर समिती स्थापन करण्यात आली असून त्यामार्फत निर्णय घेण्याची मागणी राणे यांनी केली आहे. आंबा, काजू, मच्छीमारी आदी उद्योगांवर जिल्हय़ाचे अर्थकारण अवलंबून आहे. त्यामुळे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे मंत्रालयात वजन असले, तर ते या निर्णयासाठी ‘स्पेशल केस’ म्हणून वापरले जाण्याची गरज असल्याचे राणे यांनी सांगितले. हा निर्णय झाला नाही, तर जिल्हय़ातील लहान उद्योग ठप्प राहून त्याचा मोठा आर्थिक फटका येथील जनतेला बसणार आहे. त्यामुळे याबाबत सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. o:p>