वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारी भारताची टॉप सीडेड महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचे लक्ष आता या वर्षांअखेरीस स्पेनमध्ये होणाऱया वर्ल्ड चॅम्पियनशिपवर असेल.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील आपल्या कामगिरीच्या आठवणी ताज्या असून त्या लवकर विसरता येणार नसल्याचे ती म्हणते. दरम्यान 26 वर्षीय पी.व्ही. सिंधूने ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासात पाठोपाठ दोन पदके मिळविण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारी सिंधु ही भारतातील पहिली तर जगातील दुसरी महिला स्पर्धक आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत सिंधुने महिला एकेरीत रौप्यपदक पटकाविले होते. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत तिची कामगिरी निश्चितच दर्जेदार झाली पण उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला चिनी तैपेईच्या बॅडमिंटनपटूंकडून हार पत्करावी लागल्याने तिचे रौप्यपदक हुकले पण त्यानंतर झालेल्या कास्यपदकासाठीच्या लढतीत सिंधुने चीनच्या बिंग जिआवचा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
टोकियो ऑलिंपिकच्या आठवणी अद्याप ताज्या असून त्या लवकर विसरू शकत नाही पण आता माझे लक्ष चालू वर्षांअखेरीस स्पेनमध्ये होणाऱया विश्व बॅडमिंटन स्पर्धेवर राहील, असे ती म्हणाली. गेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत सिंधुने महिला विभागात विश्वविजेतेपद मिळविले होते. आता ते पुन्हा स्वतःकडे राखण्यासाठी सिंधु जोरादार सरावावर भरत देईल. 2024 साली होणाऱया पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेत मी निश्चित सहभागी होवून भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची ग्वाही तिने दिली आहे. स्पेनमधील होणारी विश्व बॅडमिंटन स्पर्धा कोरोना महामारी समस्येमुळे लांबणीवर टाकण्यात आली असून आता ही स्पर्धा स्पेनमधील हुयेलेव्हामध्ये 12 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार आहे. ऑलिंपिक स्पर्धेत आपल्याला कास्यपदक मिळविता आल्याने सिंधुने आपले प्रशिक्षक पार्क तेई संग यांचे आभार मानले आहे. 2018 साली झालेल्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सिंधुने रौप्यपदके मिळविली होती.