मालिकांचे शुटिंग सध्या बंद असल्याने कलाकारांना बऱयाच दिवसांनी खूप मोठी सुट्टी मिळाली आहे. पण सगळीकडेच जरा काळजीचे वातावरण असल्याने घरी बसणे अत्यावश्यक झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायचे, जिम आणि मॉल बंद असल्याने आता करणार तरी काय हा प्रश्न आपल्या सगळय़ांनाच पडला आहे… पण या मध्येच आपले लाडके कलाकार त्यांचे काही छंद जोपासताना दिसत आहेत. त्यामधील एक आहेत कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेतील सिद्धी-शिवा म्हणजेच विदुला आणि अशोक… आता ते आपापल्या घरी परत गेले असून, सिद्धीला झाडांची विशेष आवड आहे आणि त्यामुळेच ती आता काही वेळ झाडांची काळजी घेण्यामध्ये देणार आहे. झाडे लावा… झाडे जगवा असा संदेश आपण नेहमीच सर्वांना देत असतो. विदुला देखील तिच्या प्रेक्षकांना हाच संदेश देणार आहे.

तर अशोक सध्या अवांतर वाचन, तब्येतीची विशेष काळजी घेणार आहे… एरव्ही शुटिंगमध्ये असल्याने काही गोष्टी करायच्या राहून जातात. बऱयाचशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आता यानिमित्ताने या बाबींकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला आहे तर त्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणार आहे, असे अशोक म्हणाला.