माळमारुती पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षकांचे ग्रामस्थांना आश्वासन
वार्ताहर /सांबरा
कणबर्गी येथील डोंगरमाथ्यावर वसलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील डोंगराळ भागात यापुढे प्रेमीयुगुल आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन माळमारुती पोलीस स्थानकाचे पीएसआय नानाप्पा तलवार यांनी श्री सिद्धेश्वर पंच कमिटीच्या सदस्यांना दिले.
येथील डोंगरमाथ्यावर वसलेल्या व निसर्गाच्या कुशीत असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. डोंगराळ भाग तसेच झाडेझुडपे असल्याने एकांताच्या शोधात येथे प्रेमीयुगुल येत आहेत. त्यामुळे मंदिर परिसराचे पावित्र्य धोक्मयात आले आहे. येथे येणाऱया प्रेमीयुगुलांना गावातील तरुणांनी अनेकवेळा समज दिली तरी त्यांचे येणे सुरूच आहे. श्री सिद्धेश्वर मंदिर ते रामतीर्थ मंदिरपर्यंत असणारा डोंगराळ भाग हिरवाईने नटलेला आहे. या ठिकाणी प्रेमीयुगल येत असल्याचे आढळून आले आहे. बालाजी मंदिरला येऊन दर्शन घेणे इथपर्यंत ठीक आहे, पण येथील डोंगराळ भागात बसून अश्लील चाळे करणे. यामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट होत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीसाठी सिद्धेश्वर पंच कमिटीने गुरुवारी माळमारुती पोलीस स्थानकाचे पीएसआय नानाप्पा तलवार यांची भेट घेतली.
यावेळी पीएसआय नानाप्पा तलवार म्हणाले की, यापुढे दररोज सिद्धेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा पहारा ठेवण्यात येणार असून रविवारी दिवसभर त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येतील व येथील डोंगराळ भागात प्रेमीयुगुल आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी पंचकमिटीला आश्वासन दिले.
पीएसआय नानाप्पा तलवार यांच्या भेटीप्रसंगी माजी महापौर शिवाजी सुंठकर, किसन सुंठकर, रामा दसका, श्रीकांत कृष्णोजी, परशराम मालाई, परसु घुगरट्टी, दीपक घुगरट्टी, प्रकाश मुचंडीकर, आप्पय्या बिरजे, सुबराव करडी, सिद्धराज सांबरेकर, मनोहर करडीसह सिद्धेश्वर पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.