कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून आदेशपत्रक जारी : 28-29 ऑगस्ट रोजी होणार परीक्षा
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य सरकारने यंदा कोरोना परिस्थितीमुळे बारावीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने विविध व्यावसायिक कोर्सच्या प्रवेशासाठी 28 आणि 29 ऑगस्ट रोजी सीईटी (सामान्य प्रवेश परीक्षा) घेण्याची घोषणा केली आहे. या परीक्षेसाठी मंगळवार दि. 15 जूनपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. परीक्षा प्राधिकरणाने सोमवारी यासंबंधीचे आदेशपत्रक जारी केले आहे.
कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाने यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उच्चशिक्षण शिक्षण खात्याने सीईटेचे वेळापत्रकही जाहीर केले होते. आता परीक्षा प्राधिकरणाने जारी केलेल्या पत्रकानुसार इंजिनियरिंग, तंत्रज्ञान, योगा ऍण्ड नॅच्युरोपॅथी, बी-फार्मा, दुसऱया वर्षातील बी-फार्मा, डी-फार्मा आणि कृषी विज्ञान कोर्सच्या प्रवेशासाठी मंगळवारपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
मंगळवारी दुपारी 12 वाजल्यापासून http://kea.kar.nic.in या वेबसाईटवर अर्ज करण्यास प्रारंभ होईल. तर 10 जुलै अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी 13 जुलै शेवटची मुदत आहे. तर अर्जातील माहिती दुरुस्तीसाठी (अर्जाचे शुल्क भरलेल्यांनाच) 19 जुलै ते 22 जुलै रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत मुदत असेल तसेच 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 पर्यंत हॉलतिकीट डाऊनलोड करता येतील.
वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, युनानी, होमियोपॅथीच्या जागांसाठी अर्ज करू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांनी 2021 मधील नीट परीक्षेत पात्रता मिळविलेली असावी. आर्किटेक्चर जागेसाठी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने 2021 या वर्षात घेतलेल्या एनएटीए परीक्षेत किंवा 2021 मधील जेईई पेपर-2 मध्ये पात्रता मिळविलेली असावी. यासंबंधी अधिक माहितीसाठी http://kea.kar.nic.in या वेबसाईटला भेट देता येईल.