काम संथगतीने : प्रवाशांतून नाराजी, कामात गती आणण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती (सीबीटी) बसस्थानकाच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅब भरणीला तब्बल चार वर्षांचा कालावधी लागला आहे. त्यामुळे प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत बसस्थानकाच्या विकास कामाला चार वर्षांपूर्वी प्रारंभ झाला होता. हे काम संथगतीने सुरू असल्याने पूर्ण होण्यास अद्याप किती वर्षे लागणार, हा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे.
प्रवाशांच्या सोयीखातर दोन्ही बसस्थानके हटवून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज बसस्थानके उभारण्यात येत आहेत. त्यामुळे बसस्थानकाच्या आवारात पर्यायी बस थांब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकरिता नवीन उभारण्यात येत असलेल्या बसस्थानकाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू असल्याने मागील चार वर्षांत केवळ पहिल्या मजल्यापर्यंतच काम पूर्ण झाले आहे. परिणामी परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. शिवाय मध्यवर्ती बसस्थानकात शहर, ग्रामीण आणि लांब पल्ल्याच्या बसेस एकाच ठिकाणी उभारण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
कोरोनामुळे मध्यंतरी परप्रांतीय आपल्या मूळगावी परतल्याने कामाला स्थगिती मिळाली होती. दरम्यान स्थानिक कामगार मिळत नसल्याने काम लांबणीवर पडले होते. मात्र आता परप्रांतीय कामगार परतले असले तरी कामाला गती येत नसल्याचे दिसून येत आहे.
तळमजल्यात चार चाकी आणि दुचाकीसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. पार्किंगसाठी मोठी जागा ठेवण्यात आल्याने चारचाकी व दुचाकी घेऊन येणाऱया प्रवाशांना सोयिस्कर होणार आहे. सुसज्ज पार्किंग व्यवस्था होत असली तरी या कामासाठी तब्बल चार वर्षांचा कालावधी लागला आहे. बसस्थानकात शहर आणि ग्रामीण भागात धावणाऱया बससाठी थांबा उभारण्यात येणार आहे. मात्र अद्यापही पहिल्या मजल्याचे काम सुरू असल्याने बसस्थानक कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.