दुसऱया मजल्याच्या कामाला प्रारंभ : तळमजल्यात पार्किंग व्यवस्था : प्रवाशांसाठी विशेष फलाटांची निर्मिती होणार
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत सीबीटी बसस्थानकाचा विकास साधला जात आहे. मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाला आता गती प्राप्त झाली आहे. दुसऱया मजल्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच काम पूर्णत्वाकडे जाईल, अशी आशा परिवहनला आहे.
कोरोनामुळे सीबीटी बसस्थानकाचे काम रखडले होते. आता सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या मजल्याचे काम पूर्ण करून दुसऱया मजल्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. मध्यवर्ती बसस्थानक आणि सीबीटी बसस्थानकाच्या कामासाठी तब्बल 102 कोटींचा निधी खर्ची घातला जात आहे. या निधीतून सुसज्ज बसस्थानक उभारण्याबरोबरच विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. सीबीटी बसस्थानकाच्या तळमजल्यात भव्य प्रमाणात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एकाचवेळी हजारो गाडय़ा पार्क करण्याची क्षमता आहे. त्यामुळे प्रवासी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
शहरांतर्गत बससेवा सुरळीत व्हावी, यासाठी सीबीटी बसस्थानकाची निर्मिती केली जात आहे. शहरांतर्गत विविध मार्गांवर धावणाऱया बस याठिकाणी थांबविल्या जाणार आहेत. यासाठी विशेष फलाटांची निर्मिती केली जात आहे. याबरोबरच प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी बसथांबे उभारले जाणार आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत काम लांबणीवर पडले होते. दरम्यान परराज्यांतील कामगार मूळगावी परतल्याने काम थांबले होते. मात्र आता कामाला गती आली आहे.
मे पर्यंत काम पूर्ण होणार – पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रक)
सीबीटी बसस्थानकाचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला मे महिन्याची डेटलाईन देण्यात आली आहे. कोरोनामुळे बरेच दिवस कामबंद राहिल्याने ठप्प झाले होते. आता कामाला गती मिळाली असून ते मे महिन्यापर्यंत पूर्णत्वाकडे येईल.