शहरासह उपनगरातील 134 बसमध्ये ट्रॅव्हलकार्डची सुविधा : प्रवास झाला स्मार्ट
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहनने प्रवाशांसाठी ट्रॅव्हलकार्ड योजना राबविली आहे. या योजनेला शनिवारी मध्यवर्ती बसस्थानकात सुरुवात करण्यात आली. आमदार अनिल बेनके, विभागीय नियंत्रण अधिकारी पी. वाय. नायक यांच्या हस्ते या योजनेला चालना देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना आता या कार्डच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे. शहराबरोबर उपनगरातील बसमध्येदेखील ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
शहर आणि उपनगरातील 134 बसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सुट्या पैशांची कटकट थांबणार आहे. शहराबरोबर वडगाव, अनगोळ, येळ्ळूर, होनगा, काकती, कंग्राळी, कणबर्गी आदी बसमध्येदेखील ही सुविधा उपलब्ध आहे. या ट्रॅव्हलकार्डमध्ये रिचार्ज करून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे खिशात पैसे आहेत की नाही? याची चिंता करावी लागणार नाही. हे ट्रॅव्हलकार्ड प्रवाशांना मोफत वितरित होणार आहे. यामध्ये 50 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करून प्रवास करता येणार आहे. विशेषत: या कार्डच्या माध्यमातून प्रवास केल्यास तिकीट दरात 20 टक्के सूट दिली जाणार आहे.
शहरात यापूर्वी 20 बसमध्ये ही सुविधा सुरू केली होती. मात्र आता शहर व उपनगरातील शेकडो बसमध्ये ट्रॅव्हलकार्ड सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशंना ट्रॅव्हलकार्डच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या कामगार आणि नोकरदार वर्गाला ही सुविधा सोयिस्कर होणार आहे. या कार्डच्या माध्यमातून आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रांनादेखील प्रवास करता येणार आहे. एकदा या कार्डमध्ये रिचार्ज केल्यानंतर ही कार्ड खिशात घेऊन बसचा प्रवास करणे सोपे होणार आहे. या कार्डामध्ये बसवाहकाकडून रिचार्ज करून घेता येते. त्यामुळे सर्वसामान्यांना आता ट्रॅव्हलकार्डच्या माध्यमातून बस प्रवास करणे सोयिस्कर होणार आहे.
बसमध्येच रिचार्ज करता येणार
बेळगाव आणि उपनगरातील सर्व बसमध्ये ट्रॅव्हलकार्ड सुविधा सुरू केली आहे. प्रवाशांनी बसवाहकांकडून ही ट्रॅव्हलकार्डे घ्यावीत, शिवाय यामध्ये रिचार्ज करून बसचा प्रवास करावा, रिचार्जची सुविधा संबंधित बसवाहकाकडे उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे बसमध्येच रिचार्ज करता येणार आहे.
– के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)