शिवसेना कुणाची ? जानेवारीमध्ये होणार युक्तिवाद
नवी दिल्ली
शिवसेना कुणाची हा प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. पण सोमवारी झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय दिला नाही. ही सुनावणी आता पुढील वर्षी म्हणजे 2023 च्या जानेवारी महिन्यात होणार आहे.
राज्यातील सत्तासंघर्षानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये शिवसेना नेमकी कुणाची? यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार होती. मात्र सोमवारी होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार ‘धनुष्यबाणा’वरील पुढील सुनावणी नव्या वर्षात होणार आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली.
शिवसेना आणि शिंदे गटाच्या पक्षचिन्हाच्या हक्कावर सोमवारी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगात सुनावणी झाली. बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी या सुनावणीच्या वेळेस निवडणूक आयोगात उपस्थित होते. सोबतच वकिलही उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने खासदार अनिल देसाई उपस्थित होते. मात्र बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने कुणीही हजर नव्हते. या प्रकरणावर आता पुढील सुनावणी ही जानेवारी महिन्यात होणार आहे, पहिल्या आठवडय़ात यावर चर्चा होणार आहे, कोणत्या पक्षाने किती सदस्यांनी माहिती दिली, किती कागदपत्र सादर केली, याबद्दल पुढील सुनावणीमध्ये चर्चा होणार आहे. अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.
दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने जवळपास 15 लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांचे पत्र आणि तीन लाखाच्या जवळपास शपथपत्र केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आतापर्यंत सादर करण्यात आलेले आहे. त्याच बरोबर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने 7 लाख सदस्यांची नावे केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेली आहे. तर आतापर्यंत ठाकरे गटाकडून 182 राष्ट्रीय पदाधिकाऱयांचे पत्र, जवळपास 2 लाख 83 हजार पदाधिकाऱयांचे प्रतिज्ञापत्र आणि जवळपास 15 लाख प्राथमिक सदस्य नोंदणी निवडणूक आयोगाला सादर करणार आहे.