
बहाद्दरवाडी /आण्णाप्पा पाटील
हलगी रणवाद्यांच्या गजरात व शेकडो कुस्तीशौकिनांच्या उपस्थितीत महाराष्ट्र चॅम्पियन, हंडे पाटील तालीम सांगलीच्या सुबोध पाटीलने कर्नाटक केसरी, मुंबई महापौर केसरी सुनील फडतरे याला अवघ्या 3 मिनिटात गदालोट डावावर चितपट करून पिरनवाडी कुस्ती मैदान जिंकले.
पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती संघटना यांच्यावतीने खास हजरत शाह सद्रोद्दीन अन्सारी उर्फ जंगलीपीर उरुसानिमित्त रविवारी सायंकाळी पिरनवाडीत नगरपंचायतीच्या बाजूला जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम क्रमांकाची कुस्ती सुनील फडतरे व सुबोध पाटील यांच्यात लावण्यात आली. एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत दोन्ही पैलवानांनी कुस्ती प्रारंभ केला. दोघेही एकमेकांवर आक्रमक होऊन वेगवेगळा डाव मारण्याचा प्रयत्न करीत होते. या कुस्तीत अखेर तिसऱया मिनिटाला सुबोध पाटीलने सुनील फडतरे याला चितपट करून विजय प्राप्त केला.

प्रथम क्रमांकाची कुस्ती मल्लविद्या आश्रयदाते पुरस्कारप्राप्त सतीश पाटील, हणमंत गुरव, पिरनवाडी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आप्पाजी मुचंडीकर, शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले व इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीसाठी कृष्णा पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.
कर्नाटक केसरी संगमेश बिरादार विरुद्ध भोसले व्यायामशाळा महाराष्ट्रचा पैलवान मारुती सूर्यवंशी यांची दुसऱया क्रमांकाची कुस्ती सुदर्शन फार्मसीचे संचालक शंकर सोळंकी यांच्या हस्ते लावण्यात आली. संगमेशने उलटी पकड लावून मारुती सूर्यवंशीला घिस्सा डावावर चितपट करून उपस्थित कुस्तीप्रेमींची वाहव्वा मिळविली. शिवाजी चिंगळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
तिसऱया नंबरची कुस्ती हुक्केरी येथील शिवा दड्डी विरुद्ध सांगली येथील गुलफाम मुजावर यांच्यात लावण्यात आली. कुस्ती जवळपास पंधरा मिनिटे रंगत राहिली. एका पैलवानाला दुखापत झाल्यामुळे ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. पंच म्हणून शिवाजी पाटील यांनी काम पाहिले.
चौथ्या नंबरच्या कुस्तीत तासगाव येथील समीर मंडले याने रोहित पाटील याला सहाव्या मिनिटावर आखडी डावावर चितपट केले. कंग्राळी गावाच्या रोहितनेही समीरला जोराची टक्कर दिली होती. यामुळे कुस्तीप्रेमींनी रोहितचेही कौतुक केले. ही कुस्ती अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यकारिणी मंडळाच्यावतीने लावण्यात आली. पंच म्हणून कृष्णा पाटील यांनी काम पाहिले.
अमृत पाटील (बुद्धिहाळ), पार्थ कृष्णा पाटील (कंग्राळी), रुपेश कुगजी (कर्ले), उमेश कडोली, सचिन हडलगेकर (निट्टूर, कोवाड), किरण संतिबस्तवाड, संकेत कडोली, ध्रुव (कंग्राळी), दयानंद इंगळी (हुक्केरी), कार्तिक जाधव (निट्टूर, कोवाड), हरिष पाटील (बुद्धिहाळ), ओमकार, सतीश संतिबस्तवाड या पैलवानांनी आपल्या प्रतिस्पर्धी पैलवानांना चितपट करून विजय मिळविले.
आखाडय़ाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आप्पाजी मुचंडीकर हे होते. हनुमान फोटो पूजन व छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱयांच्या हस्ते करण्यात आले. फीत कापून आखाडय़ाचे उद्घाटन शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी शहापूरकर व पंच मंडळींच्या हस्ते आखाडय़ाचे पूजन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल, इलियाज माणगावकर, कृष्णा बिंदले, दस्तगीर वालीगर, रोहित मुचंडीकर, निवृत्त कॅप्टन चांगाप्पा पाटील, अरुण जाधव, श्याम मडवाळकर, आदींसह जंगलीपीर दर्गा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
कुस्ती आखाडय़ाचे उद्घाटन झाल्यानंतर पहिली बाल पैलवानांची कुस्ती कुणाल गौतम विरुद्ध मच्छे येथील गौरव लाड यांच्यात लावण्यात आली. आखाडय़ातील लहान पैलवानांची ही कुस्ती बरीच रंगतदार झाली. यामध्ये गौरव विजयी झाला. शिवाजी मंडोळकर व बाबू पाटील यांनीही आखाडय़ातील पंच म्हणून काम पाहिले.
सहा नंबरची कुस्ती ठरली लक्षवेधी
या आखाडय़ात सर्वाधिक रंगतदार आणि गाजलेली सहा नंबरची कुस्ती हातकणंगले येथील हर्षद दानवळे विरुद्ध पेमनाथ कंग्राळी यांच्यात झाली. कुस्ती डोळय़ांचे पारणे फेडणारी ठरली. दहा-बारा मिनिटानंतर कुस्तीचा निकाल लागला. मात्र एका बाजुने कुस्ती निकाली झाली, असा आवाज आला तर दुसऱया बाजूने कुस्ती व्यवस्थित झाली नाही. निर्णय योग्य नाही, अशी आरडाओरड झाली. यामुळे अखेर पंचही अडचणीत आले. शेवटी कुस्तीप्रेमी नागरिकांच्या आग्रहास्तव व दोन्ही पैलवानांमध्ये चर्चा करून पुन्हा कुस्ती लावण्याचे ठरविण्यात आले. याला या दोन्ही पैलवानांनी संमती दिली. केवळ पाच मिनिटाचा वेळ देऊन कुस्ती सुरू झाली. वेळ मर्यादा दिल्यामुळे अखेर ही चटकदार कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. या कुस्तीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.