मडगाव पालिकेचा निर्णय : मुख्याधिकाऱयांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी/ मडगाव
सुलभ शौचालयांमध्ये प्रत्येकी एका प्रसाधनगृहाची तरतूद दिव्यांग व्यक्तीसाठी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मडगाव पालिकेने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी दिली. तीन आसनी, चार आसनी व त्यापेक्षा जास्त प्रसाधनगृहे असलेल्या शौचालयांमधील किमान एका प्रसाधनगृहाचे दिव्यांगांसाठी आवश्यक त्या प्रमाणे नूतनीकरण करण्यात येणार आहे. विद्यमान 8 शौचालयांचे त्याप्रमाणे नूतनीकरण करण्याचा निर्णय मडगाव पालिकेने घेतला असल्याचे मुख्याधिकाऱयांनी नजरेस आणून दिले.
सुलभ इंटरनॅशनलबरोबर यासाठी आम्ही पुढाकार घेतला असून सध्या ते शौचालये सांभाळत आहेत. संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार आम्हाला दिव्यांग व्यक्तींच्या गरजा भागवाव्या लागतात. म्हणून हा उपक्रम मोती डोंगर, चिंचाळ, पेडा तसेच कालकोंडा कृष्ण मंदिरनजीक स्थित सुलभ शौचालयांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले आहे. मडगाव पालिकेने पालिका क्षेत्रातील 15 ठिकाणी असलेल्या सार्वजनिक सुलभ शौचालयांवर देखरेख ठेवण्यासाठी सुलभ इंटरनॅशनलकडे पंधरवडय़ापूर्वी 5 वर्षांसाठी करार केलेला आहे. 15 ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधलेली असून देखरेखीविना तेथील स्थिती योग्य नसल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.
आधी फक्त चार सुलभ शौचालयांवर सुलभ इंटरनॅशनल देखरेख ठेवत होते. वरील करारामुळे आता पेडा, खारेबांद, हॉटेल नाझनजीक, चिंचाळ, एनआर मैदान, रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली, रेल्वे पुनर्वसन केंद्र, रेल्वे पुनर्वसन वसाहत, आझादनगर, प्रवेशद्वारावरील, मोती डोंगर, मोती डोंगर मंदिराजवळ, टेलिकॉम कार्यालय, मोती डोंगरजवळील एनआरओएचआर, सिने विशांतच्या मागे, अपोलो हॉस्पिटलच्या मागे, बालभवनजवळ तसेच कृष्ण मंदिर, कालकोंडा या ठिकाणच्या शौचालयांवर ते देखरेख ठेवतील. यातील आठ ठिकाणी सुरुवातीला दिव्यांगांच्या सोयीसाठी प्रत्येकी एक प्रसाधनगृह राखीव ठेवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱयांनी सांगितले आहे.