ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता देव यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी तृणमूलचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी, तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन उपस्थित होते.
सुष्मिता देव या आसामच्या सिलचर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. आसाममध्ये एआययूडीएफसोबत काँग्रेसच्या हातमिळवणी दरम्यान झालेल्या जागावाटपावरून त्या नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडणार असल्याचे म्हटले होते. 15 ऑगस्ट रोजी पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला होता. आज त्यांनी तृणमूल काँगेसमध्ये प्रवेश केला. पुढील वर्षी त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे देव यांच्याकडे त्रिपुराच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे सांगण्यात येते.