आजारपणामुळे सराव सामन्यातून माघार
वृत्तसंस्था/ साऊदम्प्टन
इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन आजारी पडल्यानंतर त्याची कोरोनासाठी चाचणी घेण्यात आली असून अंतर्गत संघात सुरू असलेल्या सराव सामन्याच्या उर्वरित भागात तो सहभागी होणार नसल्याचे ईसीबीने जाहीर केले.
एजीस बाऊल येथील हॉटेलमध्ये करन सध्या विलगीकरण खोलीत असून गुरुवारी त्याची चाचणी घेण्यात आली. ‘सॅम करनचे पोट बिघडल्याने त्याला त्रास होत होता. पण आज त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. त्याला आता स्वतंत्र खोलीत विलग करण्यात आले आहे. मात्र सराव सामन्यात तो आता भाग घेणार नाही. तो सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे,’ असे ईसीबीने सांगितले. त्याच्या चाचणीचा अहवाल केव्हा मिळणार, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. अंतरसंघात होत असलेल्या सराव सामन्यात त्याने पहिल्या दिवशी नाबाद 15 धावा केल्या होत्या. विंडीजविरुद्ध तीन सामन्यांची त्यांची कसोटी मालिका होणार असल्याने हा सराव सुरू आहे. यातील पहिली कसोटी 8 जुलैपासून सुरू होणार आहे. कोव्हिड 19 महामारीच्या प्रकोपामुळे सुमारे साडेतीन महिन्यांच्या ब्रेकनंतर खेळविली जाणारी ही पहिलीच क्रिकेट मालिका आहे.