कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे
वार्ताहर/ पुसेगाव
आज समाजात आजूबाजूला जातीपातीच्या भेदभावाने समाज दुभंगला जात असताना श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेत सर्व जाती धर्माची माणसे एक दिलाने नांदतात, एकोप्याने राहतात आणि सेवागिरींच्या चरणी लीन होत सर्व समावेशकतेचा, समरसतेचा, सद्भावनेचा संदेश देतात. जातीवंत खिलार जनावरांच्या प्रदर्शनामुळे माणसांबरोबरच आपल्या जनावरांवरही जिवापाड प्रेम करणारी माणसं याच गावात पाहावयास मिळतात. शेतकऱयांना आर्थिकदृष्या उन्नत आणि शेतकऱयांचा विचार करणारी, कृषीप्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱयांना समृध्द करणारी, विविध स्पर्धांचे आयोजन करून मोबाईल व इंटरनेटच्या जाळ्यातून तरूणांना मैदानावर आणणारी पुसेगावच्या श्री सेवागिरींची यात्रा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील इतर यात्रांना आदर्श देणारी ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे यांनी व्यक्त केला.
पुसेगाव (ता. खटाव) येथील श्री सेवागिरी महाराजांच्या 72 व्या पुण्यस्मरणानिमित्त वार्षिक यात्रेची सांगता बक्षीस वितरण समारंभाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास मठाधिपती प. पू. सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, प्रताप जाधव, योगेश देशमुख, सुरेश जाधव, प्राचार्य श्रीधर जाधव, बाळासाहेब जाधव, पुसेगाव पोलीस ठाण्याच्या सपोनि विश्वजित घोडके, माजी ट्रस्ट चेअरमन संजयराव जाधव, वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता राक्षे, मेनकुदळे, वसंत पवार, उपसरपंच प्रकाश जाधव आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
सपोनि घोडके म्हणाले, सामाजिक व अध्यात्मिक वातावरणात अत्यंत शांततेने पार पडणारी पुसेगावची यात्रा महाराष्ट्रातील इतर यात्रांसाठी आयडॉल आहे. यात्रेचे नियोजन करताना प्रशासनापेक्षा येथील विश्वस्तांवर येणारा त्राण खूप मोठा असून देखील यात्रेचे योग्य नियोजन होत असल्याबद्दल विश्वस्तांचा गौरव होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुरेश जाधव म्हणाले, पुसेगावच्या सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भाविकांच्या संख्येतही कमालीची वाढ होत आहे. पोलीस यंत्रणेसह विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतल्याने यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा अत्यंत सुरळीत पार पडली. त्यामुळे देवस्थान ट्रस्टवर कोणत्याही प्रकारचा ताण पडला नाही. या यात्रेचा नावलौकीक असाच वाढत राहण्यासाठी आगामी काळातही प्रशासनाच्या सर्वच खात्यांनी असेच सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, यात्रा कालावधीत सहकार्य केलेल्या सर्वच विभागांच्या अधिकारी, कर्मचारी, नागरिक व जातीवंत खिलार जनावर प्रदर्शनात बक्षिसप्राप्त मालकांचा देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मोहन गुरव यांनी केले.::