मनोमन स्मरण करीत भराडी मातेकडे ‘विश्व कोरोनामुक्ती’चे भाविकांचे साकडे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घातले साकडे
आंगणे कुटुंबियांकडूनही भाविकांसाठी प्रार्थना
इतिहासात प्रथम भाविकांच्या गर्दीविना यात्रा
दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:
आंगणेवाडीच्या इतिहासात बहुधा प्रथमच लाखो भाविकांच्या उपस्थितीविना शनिवारी भराडी मातेच्या यात्रोत्सवास प्रारंभ झाला. एरव्ही, यात्रोत्सवामुळे गजबजणारी आंगणेवाडी आणि परिसरातील रस्ते जणू भाविकांसाठी व्याकुळ झाल्याचा भास होत होता. असाल तेथून नमस्कार करण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो भक्तांनी मनोमन मातेचे गुणगाण गात ‘विश्व कोरोनामुक्ती’साठी साकडे घातले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही श्री देवी भराडी मातेला साकडे घालताना ‘माते, हे कोरोनाचे संकट दूर कर’ अशी आर्त हाक दिली.
आंगणेवाडी यात्रा म्हटल्यावर दरवर्षीच पहाटे तीन वाजल्यापासून मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. कुणी अनवाणी मातेच्या दर्शनासाठी आदल्या रात्रीच निघतो, तर कुणी मुंबई-ठाण्याहून सहाशे किलोमीटरचा प्रवास करून मातेच्या दर्शनासाठी येतो. आंगणेवाडी यात्रेसाठी बसस्थानकांवर एसटीसाठी शिस्तबद्ध लांबच लांब रांगा आणि त्या रांगांमध्ये आई-वडिलांचा हात घट्ट पकडून मोठय़ा आनंदाने यात्रेला निघालेली मुले हे चित्रदेखील प्रत्येकाच्या हृदयातील एका कोपऱयात नेहमीच घर करून असते. मात्र यंदाच्या यात्रोत्सवात गजबजलेली विविध दुकाने, राजकीय बॅनरबाजी, बडय़ा राजकीय नेत्यांची यात्रोत्सवातील रेलचेल हे उत्साहवर्धक चित्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे यंदा पाहायला मिळालं नाही. मंदिर परिसरात गर्दी होणार नाही, याची चोख काळजी जिल्हा प्रशासनाने घेतली होती. त्याला भाविकांचा प्रतिसादही मिळाला. दरवर्षीप्रमाणे यात्रेचा भाग होता आले नाही, याची सल मात्र प्रत्येक भाविकाच्या मनात राहिली. कोरोना महामारीचे संकट लवकरात लवकर दूर कर, अशी प्रार्थना भाविकांनी मनोमन भराडी मातेकडे केली.
भाविकांसाठी आंगणे ग्रामस्थांचे गाऱहाणे
श्री भराडी मातेच्या यात्रोत्सवासाठी आंगणे कुटुंबियांनी प्रथेप्रमाणे शनिवारी पहाटे वस्त्रालंकरांनी देवीची मूर्ती सजविली आणि नंतर पूजन केले. जे भाविक कोरोनाच्या निर्बंधामुळे देवीचे दर्शन घेण्यास येऊ शकले नाहीत, त्यांना चांगले आरोग्य व सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, असे साकडे देवीला घातले. त्यानंतर यात्रोत्सवास प्रारंभ झाला.
कोरोनाचा राक्षस नष्ट कर, सर्वत्र आनंद पसरू दे – मुख्यमंत्री
यात्रेला जाता न आल्याने सर्वच भाविकांची निराशा झाली. मसुरे येथील प्रस्ताव धरण प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी ऑनलाईन पद्धतीने जनतेला संबोधित करीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील याविषयीची खंत लपवता आली नाही. मला आज कोकणात येता न आल्याने इतरांप्रमाणे मीदेखील खूप बेचैन आहे. भराडी माते, हा कोरोनाचा राक्षस नष्ट कर. सर्वत्र पुन्हा आनंद पसरू दे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी घातले.
ठाण्याचे नगरसेवक वेशीवरच नतमस्तक
जिल्हा प्रशासनाकडून मालवण, कणकवली, मसुरे या ठिकाणच्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार अन्य कुणालाही आंगणेवाडीत प्रवेश दिला जात नव्हता. ठाण्याचे शिवसेना नगरसेवक दीपक वेतकर आपल्या मित्रांसमवेत दरवर्षीप्रमाणे यात्रेसाठी आले होते. परंतु, त्यांना पोलिसांनी रोखले. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वेतकर हे आंगणेवाडीच्या सीमेवरूनच भराडी मातेला नतमस्तक झाले.
पालकमंत्र्यांकडून भाविकांचे आभार
मसुरे परिसरातील धरण प्रकल्पाच्या भूमिपूजनानिमित्त आंगणेवाडी नजीकच्या परिसरात आलेले पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनीदेखील कोरोनाचे बंधन पाळत तेथूनच भराडी मातेला नमस्कार केला. भाविकांनी प्रशासनाच्या आवाहनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल पालकमंत्र्यांनी आभार मानले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवालयाच्या गाभाऱयासह सभामंडपात केलेली फुलांची सजावट आणि मंदिराच्या कळसावरून केलेला लेसर लाईटचा शो यामुळे आंगणेवाडीच्या परिसर उजळून निघाला होता.
यात्रोत्सवास पहाटे चार वाजता प्रांरभ
यात्रोत्सवाचा प्रारंभ शनिवारी पहाटे चार वाजता उत्साहात, प्रथेप्रमाणे झाला. गर्दी मर्यादित असल्याने दोन रांगांद्वारे देवीचे दर्शन देण्यात आले. तर तुलाभार करण्यासाठी वेगळ्य़ा रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. देवालयात नऊ, तर यात्रा परिसरात पंधरा असे 24 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती ‘रोहन व्हीडिओ’चे अनंत आंगणे यांनी दिली. पोलिसांकडून आंगणेवाडीत प्रवेश करणाऱया मुख्य तीन मार्गांवर बॅरिकेट्स उभारून केवळ आंगणे कुटुंबियांना पास बघूनच आंगणेवाडीत प्रवेश देण्यात येत होता. आरोग्य विभागाकडून तपासणी केल्यावरच भाविकांना देवालयात प्रवेश देण्यात आला. यासाठी मालवणकडील बाजूने मुख्य प्रवेशद्वारालगत ऑक्सिमीटर व थर्मल गनद्वारे प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच पन्नासच्या समुदायाने देवालयात सोडण्यात आले.
आंगणेवाडी ग्रामस्थांनी प्रथमच घेतले पहिल्या दिवशी दर्शन
दरवर्षी मोड यात्रेदिवशी म्हणजे यात्रेच्या दुसऱया दिवशी देवीचे दर्शन घेऊन ओटी भरणाऱया आंगणे ग्रामस्थांनी यंदा प्रथमच सहकुटुंब मुख्य उत्सवाच्या दिवशी देवीचे दर्शन घेतले.
आज मोड यात्रेने होणार सांगता
शासनाचे निर्देश पाळणे आवश्यक असल्याने यावर्षी भक्तांनी घरीच थांबून आई भराडी मातेचे मनोभावे स्मरण करावे. देवी भराडी तुमच्या मनोकामना निश्चित पूर्ण करेल. त्यामुळे भक्तांनी शनिवारी व रविवारी असे दोन दिवस आंगणे कुटुंबियांना सहकार्य करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबियांच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले. यात्रा मर्यादित स्वरुपात असल्यामुळे आरोग्य विभाग व पोलिसांचा नियंत्रण कक्ष वगळता अन्य कुठलाही कक्ष यात्रा परिसरात दिसून आला नाही. आंगणेवाडीत प्रवेश करणाऱया मुख्य तीन मार्गांवर पोलीस बंदोबस्त कडक असल्याने देवीच्या दर्शनासाठी आलेल्या आंगणेवाडीबाहेरील भक्तांना तेथूनच नमस्कार करून परतावे लागले. रविवारी मोड यात्रेने सोहळय़ाची सांगता होणार आहे.