वृत्तसंस्था/ मेलबर्न
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणारी अमेरिकेची महिला टेनिसपटू सोफिया केनिनवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तिला जेतेपद राखता आले नाही. काया कॅनेपीकडून दुसऱया फेरीत पराभूत झाल्यानंतर तिने पोटदुखीबाबत तपासणी केली असता अपेंडिसायटिस वाढल्याचे त्यात स्पष्ट झाल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
मागील वर्षी तिने ऑस्ट्रेलयन ओपन स्पर्धा जिंकली होती. सोमवारी दुसऱया फेरीत पराभव झाल्यानंतर पोटात तीव्र वेदना होत असल्याने तिने स्पर्धेतील डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यात आंत्रपुच्छ वाढल्याचे निदान झाले. सोमवारीच त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे तिने सांगितले. तिची प्रकृती आता स्थिर असून एपवर्थ हॉस्पिटल रिचमंडमधील सर्वांचे तिने आभार मानले आहेत.