प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुश्रीफ यांना इशारा
प्रतिनिधी / कोल्हापूर
भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर उत्तरे मिळतील अशी जनतेची अपेक्षा होती, पण ते सोडून दादागिरीची भाषा सुरु आहे. पण याद राखा, किरीट सोमय्या यांना एक दगड मारला तरी महागात पडेल, असा खणखणीत इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. पुणे येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाला त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत. कायद्याची चपलेने लढू नये. कारखान्यामध्ये 98 कोटी रुपये ज्या कंपन्यातून आले त्या कंपन्या कोठे आहेत. कोलकत्याच्या कंपन्यांनी थेट कोल्हापूर जिल्ह्यात गुंतवणूक कशी केली यावर मुश्रीफ स्पष्टीकरण का देत नाहीत. असे अनेक प्रश्न चंद्रकांतदादांनी उपस्थित केले. ते म्हणाले, मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या येणार होते तर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली ही हुकूमशाही आहे का असा सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले, भाजपाच्या रडारवर केवळ शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आहे हा आरोप चुकीचा आहे. लवकरच काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढली जातील. भाजपाच्या रडारवर कोणी पक्ष नव्हे तर भ्रष्टाचार, अन्याय आणि महिलांवरील अत्याचार ही प्रकरणे आहेत. मुश्रीफ यांना भाजपाने कधीही ऑफर केली नव्हती, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. भाजपा राज्यसभेची पोटनिवडणूक लढविणार असून पक्षातर्फे मुंबई भाजपाचे सरचिटणीस संजय उपाध्याय उमेदवार असतील. बुधवार 22 रोजी अर्ज दाखल करणार आहेत. मी स्वतः त्यावेळी उपस्थित राहणार आहे. अशी माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.