जलवाहिन्या घालण्याचे काम शनिवारी सायंकाळी पूर्ण
प्रतिनिधी / बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया हिडकल पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्याने दोन दिवसांपासून पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला आहे. जलवाहिन्या घालण्याचे काम शनिवारी सायंकाळी पूर्ण झाले आहे. मात्र, रविवारी हिंडलगा पंपिंग हाऊसचा विद्युतपुरवठा बंद झाला होता. परिणामी पाणीपुरवठा सुरळीत होण्यास सोमवार उजाडणार आहे.
हिडकल जलाशयामधून शहराला जादाचा पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पंपांची क्षमता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे दररोज 16 ते 18 एमजीडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जलवाहिन्यांवरील ताण वाढला आहे. पण काही ठिकाणी सिमेंटच्या जलवाहिन्या असल्याने कोणत्याही क्षणी गळती लागण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे सिमेंटच्या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय पाणीपुरवठा मंडळाने घेतला होता. त्यानुसार ठिकठिकाणी असलेल्या सिमेंटच्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्याचे काम शुक्रवारपासून हाती घेण्यात आले होते. त्यामुळे हिडकल पाणीपुरवठा योजनेचे काम बंद झाले होते.
दोन दिवसांपासून सदर काम सुरू असल्याने शहराच्या पाणी पुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला होता. जलवाहिन्या बदलण्याचे काम शनिवारी सायंकाळी पूर्ण झाले असून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पण रिकामी झालेल्या जलवाहिन्या भरण्यासाठी आणि जलशुद्धीकरण करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे रविवारीही शहराच्या विविध भागात सुरळीत पाणीपुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.
शनिवारी सायंकाळी वळीव पावसाचा मारा झाला. यावेळी जोरदार वारा सुटल्याने हिंडलगा पंपिंग स्टेशन परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. रविवारी सकाळीही हिंडलगा पंपिंग स्टेशनचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करण्यात अडथळा निर्माण झाला होता. परिणामी रविवारी पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. सोमवारनंतर शहरात सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी दिली.