फारुख शाब्दींची खा. जलील व कादरी यांच्याबरोबर चर्चा
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
आगामी काळातील सोलापूर महापालिका व सोलापूर जिल्ह्यात होणार्या विविध नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी एमआयएमआयएम पक्ष (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) ताकदीने उतरणार आहे. त्यादृष्टीने शहर- जिल्हाध्यक्ष फारुक शाब्दी यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी शाब्दी यांनी प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील आणि कार्याध्यक्ष अब्दुल गफ्फार कादरी यांची औरंगाबाद येथे भेट घेत चर्चा केली. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे आश्वासन यावेळी शाब्दी यांनी दोघांना दिले.

एकीकडे नगरसेवक तौफिक शेख हे पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी आगामी महापालिका तसेच जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणूका पूर्ण ताकदीने आणि जास्तीत जास्त लढवण्याची तयारी करताना दिसत आहेत. फारूक शाब्दी यांनी औरंगाबाद येथे प्रदेशाध्यक्ष खा. जलील आणि कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांच्या निवासस्थानी भेट घेत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली.
आगामी काळातील महापालिका व नगरपालिका निवडणूक लढवून पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक पालिकेत पाठवावे. जेणेकरून नागरिकांचे काम करण्यास पक्ष सक्षम होईल. त्यासाठी सोलापुरात योग्यरित्या पक्षाची बांधणी व पक्ष मजबुतीकरण करा,तसेच पक्षाने सोपवलेली जबाबदारी तुम्ही उत्तमरीत्या पार पाडत आहात, आणखीन कष्ट करून सोलापूरच्या महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणा, पक्षाकडून आपल्याला पाहिजे ती मदत होईल, असे कादरी यांनी शाब्दी यांना सांगितले.
शाब्दींचे २० पेक्षा जास्त जागा आणण्याचे आश्वासन
सोलापुरात अद्यापही प्रभाग रचना झाली नाही. शहर मध्य आणि शहर दक्षिण मतदारसंघात मुस्लिम समाजाचे प्राबल्य पाहता एमआयएम त्याच ठिकाणी फोकस करण्याची शक्यता आहे, 2017 च्या महापालिका निवडणुकीत एमआयएमने 36 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 9 जागा जिंकल्या. आता किमान 50 जागा लढवून 20 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचे आश्वासन शाब्दी यांनी दिले. |