तरुण भारत संवाद प्रतिनिधी/बार्शी
देशात सिताफळ शेतीच्या क्षेत्रात नाव कमावलेल्या नवनाथ कस्पटे यांनी उद्योजकीय क्षेत्रातही आपली गगनभरारी सिद्ध केली आहे. प्रगतशील शेतकरी कस्पटे यांचे चिरंजीव आणि बार्शीतील मधुबन ट्रॅक्टर्स शोरुमचे संचालक प्रविण कस्पटे यांचा नुकताच जॉन डिअर कंपनीकडून सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात सर्वाधिक विक्री करणाऱ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत प्रविण कस्पटे यांनी बार्शी तिथं सरशी हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलंय.
सिताफळचा ब्रँड असलेल्या कस्पटे कुटुंबीयांनी शेतीच्या माध्यमातून बार्शीचे नाव परदेशातही गाजवले आहे. तर, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनाही त्यांच्या शेतातील सिताफळ भेट दिले होते. आता, याच कसपटे परिवाराने शेती क्षेत्रातील उद्योगातही आपलं आणि आपल्या गावाचं नाव काढलं आहे. जॉन डिअर कंपनीच्या बार्शीतील मधुबन ट्रॅक्टर्स या शोरूममध्ये अक्टूबर 2019 ते अक्टूबर 2020 या आर्थिक वर्षांत तब्बल 431 ट्रॅक्टरची विक्री करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात सर्वाधिक विक्री करणारं शोरुम म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. प्रविण कस्पटे यांच्या उद्योजकीय प्रगतीने बार्शीचं नाव आणखी मोठं झालं आहे.
जॉन डिअरच्या माध्यमातून कस्पटे यांची मधुबन ट्रॅक्टर्स ही फर्म 2008 पासून बार्शी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रतेक तालुक्यात विक्री व सेवेसाठी कार्यरत आहे. विशेष म्हणजे विक्रीसह सेवेतदेखील त्यांचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक असल्याचे मधुबनचे संचालक प्रविण कस्पटे यांनी सांगितले. प्रवीण कस्पटेंच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि उद्योजकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Previous Article`युनिफाईड बायलॉज’चे घोडे अडले कुठे?’
Next Article कर्नाटकमध्ये दररोज कोरोना रुग्ण रुग्णसंख्या घटतेय
Related Posts
Add A Comment