प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात रिधोरे ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट, वरचेवर येथील रुग्ण कमी होण्यापेक्षा वाढतच आहेत. ग्रामीण भागातील छोट्याशा गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये रिधोरे येथे ८ , कुर्डुवाडी येथे ९ तर पडसाळी येथे एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असल्याचे तालुका आरोग्य विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले.तर माढा तालुक्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता १२० वर येऊन ठेपला आहे.
कोरोनाचा कहर ग्रामीण भागात झपाट्याने वाढत असून ही वाढती संख्या प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
कुर्डुवाडी येथील गांधी चौक परिसरातील एका स्वस्त धान्य दुकानदाराला कोरोनाची लागण झाली असून, ते बाहेरगावी उपचार घेत आहेत. पण यांना कोरोना कसा व कुठे झाला याचा शोध स्थानिक प्रशासन घेत आहेत. त्याचबरोबर उशिराने आलेल्या अहवालात माढा रोडवरील बाधित रुग्णाच्या संपर्कातील आणखी दोघा जणांना कोरानाची लागण झाली असून एस टी स्टँड परिसरातील पूर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील एकूण ६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
शहरात एकूण ९ बाधित व्यक्तींची आज नव्याने वाढ झाली असून शहरातील एकूण बाधितांची संख्या २४ झाली आहे. आज या बाधितांच्या संपर्कातील ३४ व्यक्तींची अॅन्टीजेन टेस्ट घेण्यात आली .सर्व निगेटीव्ह आले आहेत. तर काल घेण्यात आलेल्या १४ स्वॅब चे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तालुक्यातील पडसाळी येथे १ तर रिधोरे येथे ८ व्यक्ती पूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत . रिधोरे येथे आतापर्यंत एकूण ३९ कोरोनाबाधित रुग्ण असून १० जण बरे होऊन घरी परतले आहेत.
Related Posts
Add A Comment