तरुण भारत संवाद, प्रतिनिधी / सोलापूर
देशासह जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दरम्यान कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोलापूर येथील युवा चित्रकार पुष्कराज गोरंटला यांनी पोलिसांच्या रूपात विठ्ठलाचे दर्शन घडवणारे अप्रतिम चित्र साकारत पोलिसांना अनोखी सलामी दिली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे यंदाची आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. अगदी मोजक्या लोकांमध्ये ही वारी होणार आहे. त्यामुळे आषाढी वारीसाठी वारकऱ्यांनी पंढरपूरला येऊ नये म्हणून आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीसुद्धा वारकरी पंढरपूरला येत होते. मात्र पोलिसांच्या वतीने विनंती करून वारकऱ्यांना माघारी पाठवत आहेत. दरम्यान सोलापुरातील युवा चित्रकाराने पोलिसाच्या रुपात विठ्ठल दर्शन घडवणारे व यंदाची वारी घरी करावी असे आवाहन करणारे चित्र रेखाटले आहे. हे चित्र त्यांनी सोलापुरातील सात रस्ता येथे अक्रीलिक स्वरूपाच्या 3 बाय 5 साईजच्या कॅनव्हासवर रेखाटले आहे. यासाठी त्यांना तब्बल तीन तास वेळ लागला. सोलापुरातील कलावंत चित्रकार, सामान्य नागरिकांसह, पोलिसांनीही या चित्राचे कौतुक केले.
पोलिसांच्या रुपातले विठ्ठलाचे चित्र
यंदाची वारी घरातच साजरी करावी, पोलिसांना अनोखी सलामी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, पोलीस, प्रशासन मेहनत घेत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलिस दिवसरात्र सुरक्षा देत आहेत. यंदाची वारी घरातूनच साजरी करावी, या उद्देशाने पोलिसांच्या रूपात विठ्ठलाचे दर्शन घडवणारे अशा प्रकारचे चित्र साकारले आहे.
पुष्कराज गोरंटला, युवा चित्रकार, सोलापूर