जंगलांच्या जवळपास असणाऱ्या मानवी वस्त्या आणि शेतांवर होणारे वन्य प्राण्यांचे हल्ले आणि त्यांच्यापासून बचावासाठी विजेच्या कुंपणांचा होणारा उपयोग यामुळे देशभरात हजारो वन्य प्राणी दगावल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्याचवेळी चवताळलेल्या वन्य प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यात माणसांचे बळीही मोठ्या प्रमाणावर गेले आहेत. शिवाय प्रत्येक वषी शेतीचे नुकसानही ठरलेले आहे. ज्या प्रमाणात हे नुकसान होते त्या प्रमाणात वन खात्याकडून भरपाई मिळत नसल्याने आणि जंगलांची हद्द वाढवली जात असल्याने गावे उठवण्याचे प्रमाण वाढू लागल्यापासून मानव आणि वन्य प्राण्यांचे असणारे नाते हे वैरत्वाच्या दिशेने जाताना दिसते आहे. अशा काळात या परिस्थितीवर मात करण्याची कितीही आश्वासने राज्यकर्त्यांकडून किंवा वनविभागाकडून दिली तरी त्यावर प्रभावी उपाय झालेला नाही. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा सीमेवर हत्तींच्या कळपाकडून होणारे हल्ले आणि या रानटी हत्तींना रोखण्यासाठी केले जाणारे उपाय पूर्णत: व्यर्थ गेलेले आहेत. मोठमोठ्या चरी खोदून हत्तींना ज्या-त्या भागात रोखण्याचा प्रयत्न करणे धोक्मयाचे होऊन त्यात वन्य प्राण्यांचे मृत्यू ओढवल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. पाळीव हत्ती आणून रानटी हत्तींना हुसकावून लावण्याचे अफलातून प्रयोगही फसलेले आहेत. खाणकाम, जंगलतोड, मुलांचा बेसुमार उपसा आणि बदलत्या हवामानाने झालेल्या अन्नटंचाईमुळे गवे, बिबटे, अस्वल, हरीण असे वन्य प्राणी आता शेत शिवारात आणि मोठ्या शहरांमध्येही घुसू लागल्याची उदाहरणे आहेत. कोल्हापूर, सांगली, बेळगाव शहरामध्ये आलेला बिबट्या किंवा गवे, चंदगड तालुक्मयात अस्वल, शिराळा, शाहूवाडीसह दाजीपूर, राधानगरीत सहज दिसणारे, नुकसान करणारे गवे पुणे-बेंगळूर महामार्गावर, रेल्वे मार्गावर हरणांची आणि बिबट्यांची वाहनांशी होणारी टक्कर अशा घटना सातत्याने घडत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सीमेवर दोडामार्ग ते थेट कुडाळ पर्यंतच्या भागात आजही हत्तींचे हल्ले ही मोठी समस्या आहे. दोन दशकात प्रभावी उपाय सापडला नाही. मात्र भूतान ते आसाम या भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर बोरनाडी नदीच्या किनाऱ्यालगत भूतानमधून अन्नाच्या शोधात मोठ्या प्रमाणावर हत्ती भारतीय शेतामध्ये घुसायचे. शेतीचे व जिविताचे प्रचंड नुकसान व्हायचे. संध्याकाळी घराबाहेर पडणेही लोकांना मुश्कील होते. 18 किलोमीटर लांबीच्या सौर कुंपणामुळे या परिस्थितीत बराच बदल झाला. ज्याचा विचार आपल्या भागातील या तिन्ही राज्यांनी तातडीने करण्याची आवश्यकता आहे. आसामच्या वाफसा जिह्यातील सुमारे दहा हजार नागरिकांचा जीव सौरकुंपणामुळे भांड्यात पडला आहे. हत्तींच्या हालचाली आणि भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून ‘अरण्यक’ संघटनेच्या पुढाकाराने हा प्रस्ताव आला. फेब्रुवारी 2021 मध्ये एलिफंट फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे यासाठी निधी मिळाला. वन खात्याने कुंपण उभारणीत स्थानिकांना सामाऊन घेतले. त्यामुळे काँक्रीटचे भक्कम कुंपण आणि आवश्यक तिथे सौरदिवे उभे राहिले. अंधारातही लोकांना वन्य प्राण्यांचा अंदाज येऊ लागला. या सौर ऊर्जा कुंपणामध्ये सौम्य वीज प्रवाह सोडण्यात येतो. प्राण्याचा कुंपणाला स्पर्श झाला की विजेचा धक्का बसतो आणि तो तात्काळ माघारी वळतो. या धक्क्याने वन्य प्राण्याचा जीव जात नाही. कर्नाटकनंतर आसाममध्येच हत्तींची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्याकडे यशस्वी झालेला हा प्रकल्प महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर अनेक बाबतीत उपयुक्त ठरू शकेल. पश्चिम घाटातून अनेक वन्य प्राणी सध्या जंगलातील अधिवास सोडून बाहेर भटकताना दिसत आहेत. गवे आणि हरणांनी केलेल्या नुकसानीने पश्चिम घाटातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विविध व्याघ्र प्रकल्पांच्या परिसरात असलेल्या शेतीचे नुकसान होत असताना लोकांनी गावे सोडावीत असा वन खात्याकडून आग्रह केला जात आहे. अशा काळामध्ये सौर ऊर्जा कुंपण एक वेगळा प्रयोग ठरू शकतो. तो भारत आणि भुतानच्या सीमेवर जसा यशस्वी झाला तसा पश्चिम घाटामध्येही सर्वत्र यशस्वी होऊ शकेल. त्यासाठी तिन्ही राज्यांच्या सरकारांनी एकत्रित कृती आराखडा आखण्याची आणि त्यांना केंद्र सरकारकडून आवश्यक ते सहाय्य मिळण्याची गरज आहे. तसे झाले तर इथला मानव आणि वन्यप्राणी दोघांचेही जीवन सुखकर होऊ शकेल. कोणताही वन्यप्राणी जोपर्यंत मानवावर हल्ला करत नाही तोपर्यंत त्याला वन कायद्याप्रमाणे पकडण्याचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत. परिणामी अनेक गावांच्या शिवारांमध्ये, ऊस शेतीमध्ये बिबट्यांनी पिलांना जन्म दिल्याचे आढळून आले आहे. याचा अर्थ ते मानवी वस्तीच्या अधिक जवळ येत असून कुत्र्यासारख्या सहज भक्ष्याच्या शोधात मानवावरही हल्ले कऊ शकतात. पश्चिम महाराष्ट्रात काही गावांमध्ये त्यामुळे आठ-आठ दिवस ऊस तोडणी बंद आहे. लोक दिवसाही घराबाहेर पडत नाहीत. हा प्रश्न भविष्यात आणखी गंभीर होण्यापूर्वी वनविभागाने पुढाकार घेऊन यावर उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. लोकांचा जीव धोक्मयात आल्यानंतर आणि त्यांच्याकडून काही गैरकृत्य घडल्यानंतर पुढचे पाऊल उचलण्यापेक्षा आधीच प्रतिबंधक आणि सर्व हितकारी भूमिका घेतली तर या प्रश्नतून कायमची सुटका होईल.
Previous Articleभारत-ऑस्ट्रेलिया शेवटची कसोटी उद्यापासून
Next Article भाजप प्रगती रथयात्रेचे काकती येथे जल्लोषी स्वागत
Related Posts
Add A Comment