युनिकॉर्न’ने शतक गाठल्याची मन की बातमध्ये माहिती ः ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित करताना स्टार्टअप्समधील कामगिरीचे कौतुक केले. 5 मे रोजी देशातील युनिकॉर्नची संख्या 100 वर पोहोचली आहे, असे सांगत पंतप्रधानांनी हे नवभारताचे प्रतिबिंब असल्याचे स्पष्ट केले. आपल्या एकूण युनिकॉर्नपैकी 44 युनिकॉर्न गेल्या वषीच तयार झाले होते. इतकेच नाही तर या वर्षातील 3-4 महिन्यात आणखी 14 नवीन युनिकॉर्न तयार झाले. कोरोना काळातही आपले स्टार्ट-अप, संपत्ती आणि मूल्य निर्मिती करत राहिले आहेत. भारतीय युनिकॉर्नचा सरासरी वार्षिक वाढीचा दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त आहे. ‘स्टार्टअप’मधील ही कामगिरी सर्वांनाच प्रेरणा देणारी असून भारताच्या सामर्थ्याप्रती नवा आत्मविश्वास निर्माण करणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाच्या कोणत्याही फलंदाजाने शतक फटकावल्याचे ऐकून तुम्हाला आनंद होत असेलच. यावेळी मात्र भारताने एका वेगळय़ाच मैदानात शतक झळकावले असून ते खूपच विशेष असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. एक युनिकॉर्न, म्हणजे किमान साडेसात हजार कोटींचा स्टार्टअप, हे तुम्हाला माहिती असेलच. या युनिकॉर्न्सचे एकूण मूल्य 330 अब्ज डॉलर्सपेक्षा म्हणजे 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
स्टार्टअप्सचे जग नवभारताच्या भावना प्रतिबिंबित करणारे आहे. आज, भारताची स्टार्ट-अप यंत्रणा केवळ मोठय़ा शहरांपुरती मर्यादित नाही, तर लहान नगरांमधून आणि शहरांमधूनही उद्योजक उदयाला येत आहेत. ई-कॉमर्स, फिन-टेक, एड-टेक, बायो-टेक अशा अनेक क्षेत्रांत ते काम करत आहेत. मला अधिक महत्त्वाची वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे भारतात ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहे, तो संपत्ती निर्माण करू शकतो, हे यावरून दिसून येते, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
बचतगटांना प्रोत्साहन
देशात स्टार्ट-अपसाठी संपूर्ण आधारभूत यंत्रणा तयार केली जात आहे, ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आगामी काळात स्टार्ट-अप जगतात आपल्याला भारताच्या प्रगतीची नवी झेप पाहायला मिळेल, अशी खात्री मला वाटते, असेही पंतप्रधान म्हणाले. गेल्या दिवसांत मला एक अद्भुत उपक्रम पाहायला मिळाला. तंजावरहून मला एक बाहुली पाठवली होती. यात जीआय टॅगिंगदेखील आहे. ती कल्पना जितकी सुंदर आहे तितकीच ती स्त्री सक्षमीकरणाची द्योतक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या उपक्रमाशी 22 बचतगट जोडलेले आहेत. त्यांच्याकडून खेळणी आणि कृत्रिम दागिने बनवले जातात. तुमच्या भागात कोणते महिला बचत गट कार्यरत आहेत हे देखील तुम्ही शोधा. एवढेच नाही तर त्यांची उत्पादनेही वापरा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
योग दिनाच्या तयारीला लागा
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. जगातील टॉप बिझनेस व्यक्तीपासून ते चित्रपटातील लोक आणि तरुण योगाचा अवलंब करत आहेत. जगात योगाची वाढती लोकप्रियता बघायला तुम्हाला आवडेल. योग दिनासंदर्भात सध्या हंडेड डे काउंटडाऊनही सुरू आहे. तुम्हीही योग दिनाची तयारी आतासूनच पूर्वतयारी सुरू करा. लोकांना प्रेरणा द्या, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
तरुणांच्या कामगिरीने पंतप्रधान खूश ‘मन की बात’च्या 89 व्या भागामध्ये पंतप्रधानांनी युवावर्गाचेही कौतुक केले. तरुण मोठय़ा संख्येने आपली मते मांडत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या महिन्यातील ‘मन की बात’ची एक पुस्तिकाही त्यांनी शेअर केली. या पुस्तिकेमध्ये मन की बातमध्ये चर्चा झालेल्या मुद्दय़ांवर मनोरंजक लेख देण्यात आले आहेत.