ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
एलन मस्क यांची अमेरिकन एरोस्पेस कंपनी ‘स्पेसएक्स’च्या फाल्कन 9 रॉकेटने चार सर्वसामान्य नागरिकांसह अवकाशात यशस्वी झेप घेतली. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5.32 वाजता फ्लोरिडाच्या केनडी स्पेस सेंटरमधून हे यान झेपावले. स्पेसएक्सच्या या यानाला ‘इन्स्पिरेशन 4’ रॉकेट असे नाव देण्यात आले आहे.
या यानातील 4 नागरिक 3 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहेत. हे नागरिक पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन 357 मैल उंचीवर प्रवास करत आहेत. 2009 नंतर पहिल्यांदाच सर्वसामान्य नागरिक इतक्या उंचीवर पोहचला आहे. या मोहिमेचे नेतृत्व 38 वषीय इसॅकमॅन करत आहेत. त्यांच्यासोबत हेली अर्केनो आणि अमेरिकेच्या हवाई दलात वैमानिक राहिलेले ख्रिस सेम्ब्रोस्की आणि 51 वषीय शॉन प्रॉक्टर आहेत.
दरम्यान, या मोहिमेचा मुख्य उद्देश अमेरिकेतील सेंट जूड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटलसाठी निधी गोळा करणे आहे. या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या इसॅकमॅन यांनी हॉस्पिटलला 100 मिलियन डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे. त्यांना या मोहिमेद्वारे 100 मिलियन डॉलर जमा करायचे आहेत.