कांगारूंचं घातक अस्त्र…स्टार्क !

चेन्नईतील तिसऱया एकदिवसीय सामन्यात जरी मिशेल स्टार्क महाग ठरला असला, तरी ही मालिका ऑस्ट्रेलियाला जिंकता आलीय ती त्यानं दुसऱया लढतीत बजावलेल्या प्रतापाच्या जोरावर…या डावखुऱया वेगवान गोलंदाजाकडे कांगांरूचं ‘वनडे’तील सर्वांत घातक अस्त्र म्हणून पाहिलं जातंय…
‘त्याच्या’ भात्यात वेग, बाऊन्स, स्विंग, यॉर्कर्स अशी घातक हत्यारं…शिवाय डावखुरा गोलंदाज असल्याचा फायदा अन् प्रभावी ‘राऊंड दि विकेट’ मारा करण्याची क्षमता…‘त्याच्या’कडे ताशी 145 किलोमीटर गतीनं चेंडू आंत आणण्याची ताकद असून ‘राऊंड आर्म’ शैलीच्या मिशेल जॉन्सन, लसिथ मलिंगा वा वकार युनूससारख्या गोलंदाजांची यशस्वी परंपरा तोही इमाने इतबारे चालवतोय…ऑस्ट्रेलियाचं भेदक अस्त्र…मिशेल स्टार्क ! 30 जानेवारी, 1990 रोजी जन्मलेल्या मिशेल स्टार्कनं अगदी लहान वयातच क्रिकेट खेळायला प्रारंभ केला. पण त्यानं गोलंदाज म्हणून सुरुवात मुळीच केली नव्हती…त्यानं सिडनीतील ‘बेरला स्पोर्ट्स क्रिकेट क्लब’मधून प्रशिक्षण सुरू केलं तसंच वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत स्टार्क खेळला तो चक्क यष्टीरक्षक म्हणून. मात्र बेरला क्लबच्या प्रशिक्षकानं त्याची 6 फूट 5 इंच इतकी उंची पाहून त्याला यष्टीरक्षण सोडण्याचा अन् वेगवान गोलंदाज बनण्याचा सल्ला दिला. तेथून सर्व काही बदललं…
वेगवान गोलंदाज बनल्यानंतर पाच वर्षांच्या आंत मिशेलनं 2009 मध्ये न्यू साउथ वेल्सतर्फे ‘शेफिल्ड शिल्ड’च्या माध्यमातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर कधीही मागं वळून पाहिलं नाही…त्यानं 2010 साली आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, परंतु त्याच्या कारकिर्दीचा सुरुवातीचा भाग सततच्या दुखापतींमुळं विस्कळीत राहिला. स्टार्कनं सर्वांचं लक्ष सर्वप्रथम वेधून घेतलं ते 2015 साली विश्वचषक जिंकणाऱया ऑस्ट्रेलियन संघाचा एक प्रमुख सदस्य या नात्यानं. संपूर्ण स्पर्धेत त्याच्या हातून सातत्यपूर्ण कामगिरी घडून त्याला ‘सर्वोत्तम खेळाडू’ घोषित करण्यात आलं… मिशेल स्टार्कनं कसोटीतही चांगलीच छाप उमटविलेली असली, तरी तो जास्त गाजलाय एकदिवसीय सामन्यांतील पराक्रमांसाठी. ‘वनडे’मध्ये 100 हून अधिक बळी घेणाऱया गोलंदाजांपैकी केवळ चारच जणांना अर्ध्याहून अधिक बळी त्रिफळा उडवून किंवा पायचित करून मिळविता आलेत. त्यापैकी तो एक (बाकीचे तिघे वकार युनूस, वसीम अक्रम व मोहम्मद शामी)…2015 पासून ‘आयपीएल’ अन् 2014 पासून मायभूमीतील ‘बिग बॅश लीग’मध्ये खेळणं स्टार्कनं टाळलंय ते ऑस्ट्रेलियातर्फे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत नियमित खेळता यावं यासाठी. त्याच्या या भूमिकेचं तिथं मोठय़ा प्रमाणात कौतुक झालंय !
स्टार्कचे एकदिवसीय पराक्रम…
- मागील रविवारी मिशेलनं वैझागमध्ये भारताला 117 धावांवर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना 109 एकदिवसीय सामन्यांत नवव्यांदा पाच बळी मिळविले. या आघाडीवर त्यानं आता बरोबरी केलीय ती पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (372 सामने) आणि खुद्द ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीशी (217 लढती)…याबाबतीत त्याच्याहून आता पुढं आहे तो पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस (13) नि श्रीलंकेचा दिग्गज ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन (10)…
- एकदिवसीय सामन्यांमध्ये 100 पेक्षा जास्त बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये स्टार्कचा स्ट्राइक रेट (25.60) हा सर्वोत्तम…
- ऑगस्ट, 2016 मध्ये मिशेल स्टार्क एकदिवसीय सामन्यांत सर्वांत जलदरीत्या 100 बळी घेणारा वेगवान गोलंदाज अन् एकंदरित विचार करता रशीद खाननंतरचा दुसरा गोलंदाज बनला. कोलंबोत श्रीलंकेविरुद्ध 52 व्या सामन्यांत त्यानं हा पराक्रम गाजवला…
- गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मिशेल ‘वनडे’मध्ये सर्वांत जलद 200 बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्यानं 104 सामन्यांत हा टप्पा गाठताना 23 वर्षं जुना विक्रम मोडीत काढला तो पाकिस्तानच्या साकलेन मुश्ताकचा….
- एकदिवसीय सामन्यांमध्ये सहा किंवा त्याहून अधिक बळी दोन वेळा घेणारा स्टार्क हा एकंदरित दहावा गोलंदाज, तर एकमेव ऑस्ट्रेलियन खेळाडू…
- 100 बळी घेतलेल्या गोलंदाजांपैकी तो (2.01) प्रत्येक सामन्यात सरासरी किमान दोन बळी घेणारा एकमेव…
ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वपूर्ण शस्त्र…
- सध्या एकदिवसीय लढतींत सर्वांत जलद 300 बळी घेण्याचा विक्रम आहे तो ब्रेट लीच्या खात्यावर. त्यानं 171 सामन्यांमध्ये हा टप्पा पूर्ण केला. स्टार्कला त्याच्या पुढील 61 लढतींत 81 बळी घेऊन तो मोडीत काढण्याची संधी आहे. तसं झाल्यास 50 षटकांच्या ‘फॉर्मेट’मध्ये सर्वांत जलद 100, 200 नि 300 बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरण्याचा मान त्याला प्राप्त होईल…
- त्यानं 10 ऑक्टोबर, 2010 रोजी वैझागमध्ये भारताविरुद्ध पदार्पण केल्यापासून फक्त श्रीलंकेच्या मलिंगानं त्याच्यापेक्षा जास्त बळी (232) घेतलेत…
- स्टार्क खेळत असताना ऑस्ट्रेलियानं 110 पैकी 72 एकदिवसीय सामने जिंकलेत अन् या वेगवानं गोलंदाजानं त्यात 17.71 च्या सरासरीनं 165 बळी घेतलेत…त्यानं नऊवेळा जे 5 बळी घेतलेत त्यापैकी आठवेळा ऑस्ट्रेलियाची सरशी झालीय…
- एकदिवसीय लढतींत सर्वाधिक बळी घेणाऱयांच्या यादीत स्टार्क 26 व्या स्थानावर…
- त्यानं 2019 च्या विश्वचषकात 10 सामन्यांमध्ये 27 बळी घेऊन 2007 च्या स्पर्धेत 11 लढतींत 26 बळी घेणाऱया ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडला…
कसोटींतही चमक…
- 2013 साली भारत दौऱयावरील कसोटीत तो नवव्या क्रमांकावर येऊन 99 धावांवर बाद होणारा पहिला फलंदाज तसंच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत किमान 100 चेंडू खेळणारा तळाकडचा पहिला फलंदाज ठरला…
- 2015 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यानच्या पर्थ कसोटीच्या तिसऱया दिवशी स्टार्कनं ताशी 160.4 किलोमीटर गतीनं टाकलेला चेंडू हा कसोटी क्रिकेटमधील सर्वांत वेगवान ठरला. मात्र सर्व प्रकारच्या क्रिकेटचा विचार केल्यास सर्वांत वेगवान चेंडू टाकण्याचा मान जमा झालाय तो पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या खात्यात 2003 साली विश्वचषक स्पर्धेत शोएबनं ताशी 161.3 गतीनं चेंडू टाकला…
- मिशेल स्टार्क 2015 साली ऍडलेड इथं न्यूझीलंडविरुद्ध गुलाबी चेंडूनं दिवस-रात्र कसोटी सामन्यात गोलंदाजी करणारा पहिला गोलंदाज ठरला…
- 2011 साली ब्रिस्बेनमध्ये ब्रेंडन मॅकलमला बाद करून पहिला बळी मिळविणाऱया मिशेलने गेल्या वर्षीच्या अखेरीस त्याच ठिकाणी दक्षिण आफ्रिकेच्या रॅसी व्हॅन डर डय़ुसेनला टिपून 300 बळी पूर्ण केले…हा टप्पा गाठणारा तो ग्लेन मॅकग्रा (561 बळी), डेनिस लिली (355), मिशेल जॉन्सन (313) आणि ब्रेट ली यांच्यानंतरचा ऑस्ट्रेलियाचा चौथा वेगवान, तर एकंदरित सहावा गोलंदाज. बाकीचे दोन हे फिरकी गोलंदाज-नॅथन लायन (450) नि शेन वॉर्न (708)…
क्रिकेटपटू पत्नी…

मिशेल स्टार्कची पत्नी ऍलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक इयान हिली यांची पुतणी अन् कांगारूंच्या महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक. सध्या ती ‘महिला प्रीमियर लीग’मध्ये ‘यूपी वॉरियर्सचं अधिपत्य करत असून यष्टरीक्षक-फलंदाज या नात्यानं त्यात तिनं चांगली कामगिरी केलीय…
खेळ जुनाच, ओळख नवी ! बॅडमिंटन

बॅडमिंटन हा 16 व्या शतकापासून खेळला जाणारा खेळ…आज तो अक्षरशः घराघरात पोहोचला आहे. त्याचे शिखर पाहायला मिळते ते ‘ऑल इंग्लंड’, जागतिक स्पर्धा नि ऑलिम्पिकमध्ये…युरोपीय राष्ट्रांबरोबरच चीन, भारत, इंडोनेशिया, मलेशियासारख्या आशियाई देशांमध्ये हा खेळ खूप लोकप्रिय बनलेला असून बॅडमिंटनच्या जगताला काही सर्वोत्तम खेळाडू तेथून लाभलेत. भारताचा विचार करता यात नंदू नाटेकर, प्रकाश पडुकोण, सय्यद मोदी, पी. गोपीचंद, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, श्रीकांत, लक्ष्य सेन, प्रणॉय आदींचा समावेश होतो…
बॅडमिंटनमध्ये रॅकेटने हाणलेले शटलकॉक जाळय़ाच्या पलीकडे प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्रात उतरायला हवे. जर प्रतिस्पर्धी शटलकॉक परतविण्यात यशस्वी झाला, तर ती रॅली झाली. ही रॅली जिंकताना जर प्रतिस्पर्ध्याला शटलकॉक कोर्टच्या बाहेर किंवा जाळय़ावर मारण्यास भाग पाडले वा शटलकॉक हुकून ते जमिनीवर पडले, तर एक गुण खात्यात जमा होतो…
बॅडमिंटनचे तीन प्रकार आहेत-एकेरी, दुहेरी नि मिश्र दुहेरी. एक सेट जिंकण्यासाठी 21 गुण जिंकणे आवश्यक असते. सहसा सामने 3 सेट्सचे असतात…
रॅकेट व शटलकॉक हे या खेळाचे महत्त्वाचे घटक…त्याचा अधिकृत सामना हा इनडोअर कोर्टवर खेळला जातो…बॅडमिंटनचे कोर्ट हे 6.1 मीटर रुंद आणि 13.4 मीटर लांब असते. आयताकृती कोर्टच्या मध्यभागी असलेली जाळी 1.55 मीटरवर बांधली जाते. कोर्टाच्या दोन्ही बाजूंनी दोन ‘ट्रम लाइन्स’ असतात. आतील ‘लाईन’ ही एकेरी सामन्यासाठी, तर बाहय़ रेषा दुहेरी सामन्यासाठी सीमा म्हणून वापरली जाते…
2006 साली बदलण्यात आलेल्या नियमामुळे आता सर्व्हिस कोणाही केलेली असली, तरी दोन्ही खेळाडूंना रॅलीदरम्यान गुण मिळू शकतो…या खेळात सर्वांत आधी जो 21 गुणांपर्यंत पोहोचतो तो सेट जिंकतो. जर गुणसंख्या 20-20 अशी बरोबरीत असेल, तर जो खेळाडू पुढे दोन गुणांची आघाडी मिळवितो तो विजयी ठरतो. गुण 29-29 असे बरोबरीत राहिल्यास पुढील गुण ज्याला मिळतो तो सेटचा विजेता ठरतो. सामना जिंकण्यासाठी 3 पैकी 2 सेट जिंकणे आवश्यक…
खेळाडूने त्याच्या प्रतिस्पर्ध्याला तिरपे सर्व्ह करायचे असते. यात दुसरी सर्व्हिस नसते. त्यामुळे पहिली सर्व्हिस बाहेर गेली वा अपयशी ठरली, तर प्रतिस्पर्ध्याला गुण मिळतो…जर एखाद्या खेळाडूच्या शरीराच्या किंवा रॅकेटच्या कोणत्याही भागाने जाळय़ाला स्पर्श केला, तर तो दोष मानला जाऊन प्रतिस्पर्ध्याला गुण प्राप्त होतो. एखाद्या खेळाडूने शटलकॉक रॅकेटवर पकडले वा दोनदा हाणले, तर तोही दोष मानला जातो…