केएलई रोड अनगोळ येथे डेनेजचे सांडपाणी रस्त्यावर : चेंबरमध्ये माती भरल्याने समस्या : परिसरात रोगराई पसरण्याची भीता

प्रतिनिधी / बेळगाव
कोणतेही नियोजन न करता स्मार्ट सिटीचे काम करण्यात आल्याने त्याचा फटका आता रहिवाशांना बसत आहे. अनगोळ येथील केएलई कॉलेज रोड येथे डेनेजचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. या ठिकाणी सांडपाण्यासाठी ठेवण्यात आलेल्या चेंबरमध्ये माती भरल्याने पाणी नागरिकांच्या घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये शिरत आहे. महानगरपालिकेला कळवूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यादव कॉलनी, कमलेश्वर कॉलनी येथील ड्रेनेज पाईपलाईन मुख्य नाल्याला जोडण्यात आली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत बेम्को क्रॉस ते चौथे रेल्वेगेट या दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. सोबतच बाजूने सायकल ट्रकही सोडण्यात आला आहे. परंतु ड्रेनेजवरून सायकल टॅक घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. नाल्याजवळच्या दोन चेंबरमध्ये पूर्णपणे माती भरली आहे. यामुळे डेनेजचे पाणी पुढे न जाता ते उलटे दुकाने व घरांमध्ये शिरत आहे.
रविवारच्या पावसाने तर पाणी मोठय़ा प्रमाणात घरांमध्ये येत असल्याने अखेर चेंबरचे झाकण उघडण्यात आले. चेंबरमधून हे पाणी रस्त्यावरून वाहत होते. याबाबत महानगरपालिकेकडे तक्रार करूनही अद्याप याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही दिवसांपूर्वी मनपाचे कर्मचारी आले असता त्यांना याबाबत नागरिकांनी विचारले त्यावेळी त्यांनी ही स्मार्ट सिटीची जबाबदारी असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराला विचारले असता मी डेनेज पाईपलाईनला हातही लावला नाही, असे त्याने सांगितले. यामुळे दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.
रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
मागील 8 ते 10 दिवसांपासून रस्त्यावर सांडपाणी साचून आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी थेट घरांमधून बाहेर पडू लागले. हे सांडपाणी रस्त्यावर अजूनही साचून असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.