ऑनलाईन टीम / मुंबई :
नवरात्र म्हटले की जल्लोष, रास गरब्याची धूम, तरुणाईचा उत्साह, देवींची आळवणी, जागर, गोंधळ…… आणि बरंच काही ! पण 2020 हे वर्ष केवळ निराशेचे ग्रहणचं घेऊन आलंय. पण निराशेमध्ये आशेची संजीवनी जो शोधतो तोच खरा माणूस!

“स्मिता ढोबळे” या कला क्षेत्रात सतत काही ना काही नाविन्यपूर्ण आणि समाजप्रबोधनात्मक विषय लोकांना देत असतात. स्त्रीत्व, जनजागृती, समाजाविषयी आपुलकी या गुणांचा अविष्कार आपल्या कलेतून सादर करत असतात. गेल्या वर्षीही त्यांनी “जागर स्त्रीशक्तीचा” मधून नवरात्रीत अनोखा उपक्रम साजरा केला होता. ह्यावर्षी त्यांनी मैत्रीण तेजश्री भाटकर हिच्या संकल्पनेतून “वंदन नवशक्तीला” हा अभिनव उपक्रम लोकांसमोर ह्या नवरात्रीमध्ये आणला आहे.
अनादी काळापासून स्त्री हि कायमच अग्रस्थानी राहिली आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात तिने तिच्या कर्तृत्वाचा ठसा देखील उमटवला आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात सीता, येसूबाई, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदी गोपाळ जोशी, डॉ. सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, किरण बेदी, आणि कल्पना चावला ह्या स्त्रीशक्तीचा गौरव, त्यांनी फोटोशूट आणि त्याला साजेशा लिखाणातून ह्या नवशक्तीला मानवंदना दिली आहे. ह्या नवशक्तीमधली प्रत्येक स्त्रीचं महत्व त्यांनी दर्शवले आहे आणि त्यांच्या कार्याचा, इतिहासाचा आढावा लोकांपर्यंत पुन्हा एकदा जागृत केला आहे. ह्यातली प्रत्येक स्त्रीशक्ती ही आपापल्या काळी स्वत:चे खंबीर, स्वाभिमानी, प्रेरणादायी, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व घेऊन त्यावर चालल्या आणि म्हणूनच जग आज कर्तृत्वला सलाम करत आहे.

सीतेचा त्याग, येसूबाईंची कणखरता, झाशीच्या राणीचा पराक्रम, सावित्रीबाईंचा ध्यास, आनंदीबाईंची जिद्द, सरोजिनी नायडूंची देशभक्ती, इंदिराजींचा आत्मविश्वास, किरण बेदींची निडरता, आणि कल्पना चावलाचे अद्वितीय साहस! ह्या साऱ्यांची सांगड घालून त्यांचा जीवनपट उलगडून तो सर्व स्त्रियांनी अंगीकारावा, असं ह्या फोटोशूटचे उद्दिष्ट आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने आज जेव्हा खरंच कुठेतरी हतबलता, नैराश्य, मानसिक खच्चीकरण ह्यासारख्या समस्या उभ्या राहिल्या आहेत त्यात स्मिता ढोबळे ह्यांचे फोटो व्हिडिओ शूट नक्कीच मनाला उभारी देणारे, नवसंजीवनी देणारे आहे.

ह्या फोटोशूटचे संपूर्ण चित्रीकरण विनीत मालवणकर ह्या नव्या दमाच्या फोटोग्राफरने केले आहे. तर तन्वी सलून स्पा ह्यांनी संपूर्ण चित्रीकरणाच्या जागेसाठी मदत केली शिवाय स्मिता यांची रंगभूषा, केशभूषाही सांभाळली. हे फोटो आणि व्हिडिओ शूट सोशल मीडियावर गाजत आहे. तुम्हीही नक्कीच पहा.