भास्कर पेरे पाटील यांचे प्रतिपादन : निलजीतील व्याख्यानाला मान्यवरांची उपस्थिती : नागरिकांची अमाप गर्दी
युवराज पाटील / सांबरा
जर गावचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर गावकऱयांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वबळावर व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास गावचा नक्कीच विकास होईल. बाहेरून कोणीही येईल आणि गावचा विकास करतील, या भ्रमात अजिबात राहू नका, जे करायचे आहे ते गावकऱयांना स्वतः करायचे आहे. सरकार, आमदार, खासदार हे आपापल्या परिने विकास करतील. पण त्याआधी प्रत्येक गावकऱयाने आपापल्या परीने गावासाठी वेळ दिला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी केले. ते शनिवार दि. 16 रोजी निलजी येथे ग्राम विकास समिती आयोजित कार्यक्रमात ‘ग्राम पंचायत व गावचा विकास’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रू पाटील होते.

ही पाच कामे करा, गावचा विकास होईल
ते पुढे म्हणाले की, गावचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवा, वापरलेले पाणी जमिनीत जिरवा, रस्त्याच्या दुतर्फा फळ झाडे लावा, स्वच्छतेवर भर द्या व मुलांना योग्य शिक्षण द्या. ही कामे केला तर गावचा विकास साधण्यास वेळ लागणार नाही. हल्ली मुलांना वडिलांची इस्टेट पाहिजे पण आई-वडील नको, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
तसेच समाजाला कोणत्या गोष्टी करू नका हे सांगण्यापेक्षा त्यांना पर्याय द्या, कोणत्या गोष्टी कराव्यात हे आवर्जुन सांगा. तरच समाजात परिवर्तन होईल. निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्यांनी गावासाठी जास्तीतजास्त वेळ दिला पाहिजे. लोकांच्या घरी भेटी द्या, त्यांच्या समस्या जाणून घ्या व त्या तातडीने सोडवा. अभिनव योजना राबवून ग्रामस्थांना कर भरण्यास परावृत्त करा, असे ते म्हणाले.
आईच्या दुधापेक्षा झाड श्रेष्ठ
जन्मलेल्या मुलाला आईच्या दुधापेक्षा प्रथम प्राणवायुची नितांत गरज असते. एखाद्या वेळेस बाळ आईच्या दुधाशिवाय राहू शकेल पण प्राणवायूशिवाय राहू शकत नाही. यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे. झाडे ही पावसाचे ‘एटीएम’ आहे. झाडांच्यामुळे पाऊस पडतो व अशाने भूजल पातळीत वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने एकतरी झाड लावले पाहिजे. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते. यासाठी ग्राम पंचायतीने स्वच्छतेवर भर द्यावा. सर्वांनी शौचालयाचा वापर करावा. तुम्ही कोणतेही काम करा ते मनापासून व प्रामाणिकपणे केल्यास यश हे नक्कीच मिळते. यासाठी गावकऱयांनी प्रयत्न करावेत.
पैसे घेऊन मतदान करणे हे पाप आहे
पैसे घेऊन मतदान करणे हे पाप आहे. मतदारच पुढाऱयाला भ्रष्टाचारी होण्यास जबाबदार आहेत. कारण एखाद्या पुढाऱयाने निवडणुकीत पैसा वाटला तर तो निवडून आल्यानंतर दुप्पट पैसा कमावण्याचा हेतू ठेवणार व भ्रष्टाचार वाढणार. त्यामुळे मतदारांनी कोणाचेही पैसे न घेता प्रामाणिक व्यक्तीला मतदान करण्याची सूचना केली.
प्रारंभी भास्कर पेरे-पाटील यांनी गावातील अलौकिक ध्यान मंदिराला भेट दिली. त्यानंतर गावातील तलावाच्या पुनरुज्जीवन कामाची पाहणी करून विविध मंदिरांना भेटी देत ते रामदेव गल्लीतील रामदेव मंदिरासमोरील कार्यक्रमस्थळी पोहचले. मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर भास्कर पेरे-पाटील यांनी शिवप्रतिमेचे पूजन करून व रोपटय़ाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी ‘ग्राम विकास समिती’च्या नामफलकाचे त्यांच्याच हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी भास्कर पेरे-पाटील, सुदर्शन प्रभूजी व एलआयसीचे मॅनेजर गोपीप्रसाद बिरा यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार
त्यानंतर भास्कर पेरे-पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित 22 ग्राम पंचायत सदस्य, चित्रकला शिक्षक गजानन लोहार, उत्तम कारागीर भरमा सुतार, वारकरी चंद्रकांत पाटील, लक्ष्मण पाडसकर, पीडीओ बसवंत कडेमनी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात एलआयसीच्यावतीने सरकारी प्राथमिक शाळेला 50 हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.
यावेळी सुद्रर्शन प्रभूजी म्हणाले की, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात निलजी गावाने आघाडी मिळविलेली आहे. व पुढील काळात गावकऱयांच्या एकजुटीतून गावाला आदर्श गाव करून दाखवावे. अध्यक्षीय भाषणात छत्रू पाटील म्हणाले की, अलीकडेच ग्राम पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात गावचा विकास साधण्यास हीच योग्य वेळ असल्याने व आम्हाला मार्गदर्शन लाभावे, यासाठी भास्कर पेरे-पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला.
कार्यक्रमाला ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, समाजसेवक शिवाजी कागणीकर, कडोली ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष अण्णू कटांबळेसह परिसरातील आजी, माजी लोकप्रतिनिधी, युवक मंडळांचे कार्यकर्ते व युवक व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक अलगोंडी यांनी केले.