भोर / प्रतिनिधी :
ज्या रायरेश्वरावर छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्याच भोर तालुक्याच्या बारा मावळातील छत्रपतींच्या सरदारांचे वंशज व अन्य ऐतिहासीक घराण्यातील मावळ्यांनी आज पानिपतच्या दिशेने कूच केली. रविवारी (दि.२६) पानिपत जवळील बसताडा गावात छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
पुण्यातील कलाकार दिलीप थोपटे यांनी शिवरायांची राजदंड असलेली मूर्ती तयार केली आहे. तालुक्यातील येसाजी कंक घराण्याचे वंशज रविंद्र कंक, कान्होजी जेथे घराण्याचे वंशज युवराज जेधे व अन्य शिवप्रेमींनी पुतळ्याचे निर्मीतीमध्ये अर्थसहाय्य केले. पानीपत येथेल अखिल भारतीय मराठा जागृती मंचचे अध्यक्ष विरेंद्र मराठा तसेच ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ वसंतराव केशवराव मोरे हरविंदर कल्याण यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण होणार आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला २६० वर्ष पूर्ण झाली असून, अद्याप तेथे महाराजांचा पुतळा नव्हता. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त होणार आहे.