’तो’ अध्यादेश कायद्याला धरुनच असल्याचा दावा
प्रतिनिधी /पणजी
खरे तर पालिका कायद्यात गुप्त मतदान हा प्रकारच नाही. कायद्यात तशी तरतुदही नाही. ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांची सत्ता या तत्वानुसार नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष यांची निवड होत असते, त्यामुळे नगराध्यक्ष निवडीसाठी राज्य सरकारने काढलेला अध्यादेश कायद्याला धरुनच आहे, असा दावा आमदार दिगंबर कामत यांनी केला.
मडगाव नगरपालिकेत हात दाखवून नगराध्यक्षाची निवड करण्यावरून विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी पणजीत भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार नरेंद्र सावईकर आणि माजी आमदार दामू नाईक यांची उपस्थिती होती.
ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांची सत्ता हे लोकशाहीचे मुख्य तत्त्व आहे. गोवा महानगरपालिका आणि नगरपालिका कायद्यात गुप्त मतदान घेण्याविषयी कोणतीही तरतूद नाही. नगराध्यक्ष वा उपनगराध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास ठराव आल्यास विशेष बैठक बोलावण्याची तरतूद आहे. पण मतदान गुप्त पद्धतीने घेण्याचा उल्लेख नाही. ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्यांचाच नगराध्यक्ष वा उपनगराध्यक्ष तसेच सरपंच वा उपसरपंच यांची निवड होते, असे कामत म्हणाले.
अशावेळी विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष यांची निवड गुप्त मतदानाने असो किंवा हात उंचावून असो ती एकमताने होणे आवश्यक आहे. गुप्त मतदान आणि हात उंचावून या दोन्ही पद्धतीस कायद्याचा आधार आहे. असे असताना विरोधक मात्र अकारण आदळआपट करत आहेत, अशी टीका कामत यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी, सरकारने अध्यादेश काढून योग्य काम केले आहे, असे सांगितले. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज संस्था अधिक बळकट होण्यात हातभार लाभेल. तसेच कामकाजही सुधारेल, असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला. आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याने घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या सदस्यांनी आमच्या उमेदवारालाच मतदान करावे, असे अपेक्षित असणे स्वाभाविक आहे. मग गुप्त मतदान करण्याची गरजच काय, असा सवालही कामत यांनी केला.
आर्थिक मंदीतही विकासकामांचा झपाटा : दामू नाईक
यावेळी बोलताना दामू नाईक यांनी, राज्य सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे, अशी टीका केली. काही स्वघोषित विरोधी पक्षनेते सरकारवर आगपाखड करत आहेत. यामागे ‘येनकेन प्रकारे’ माध्यमांतून झळकण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. म्हणूनच ते सरकारवर बेछूट आरोप करत आहेत. पण सरकार करत असलेली कामे जनतेसमोर आहेत. सर्वत्र आर्थिक मंदीची चाहुल असतानाही सरकार झपाटय़ाने विकासकामे करत आहे. तसेच बेकायदेशीर आणि अवैध कृत्यांवर कारवाई करत आहे. राज्यात देशद्रोही कारवाया करणाऱया संस्था, संघटनांना थारा दिला जाणार नाही. अशा संस्था, संघटनांना पैसा पुरवणाऱया आणि त्यांना आश्रय देणाऱया प्रत्येकाची चौकशी होईल, असा इशारा नाईक यांनी दिला.
विरोधी आमदार विजय सरदेसाई यांना सध्या राजकीय नैराश्य आले आहे. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था तसेच अमलीपदार्थ यावरून ते सरकारवर टीका करत आहेत. प्रत्यक्षात राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित असून अमली पदार्थ असो वा कोणतेही बेकायदा, अवैध कृत्य असो, सरकार धडक कारवाई करत असल्याचे नाईक यांनी पुढे सांगितले.
आठ नगरसेवक भाजपमध्ये
दरम्यान, याच पत्रकार परिषदेदरम्यान दिगंबर कामत गटातील 7 (पूर्वाश्रमीचे काँग्रेस) आणि गोवा फॉरवर्डशी संलग्न एक मिळून 8 नगरेसवकांनी भाजपात प्रवेश केला. दामोदर शिरोडकर, दामोदर वरक, सिताराम (सिद्धार्थ) गडेकर, सगुण नाईक, दीपाली सावळ, लता पेडणेकर, सेंड्रा फर्नांडिस आणि राजू नाईक यांचा त्यात समावेश होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते पक्षाचे उपरणे व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
भाजप गटातर्फे दामोदर शिरोडकरांचे नाव जवळजवळ निश्चित

नगराध्यक्ष निवडणूक : मडगावातील बैठकीत पक्षाच्या उमेदवारामागे सर्वांना एकसंधपणे उभे राहण्याचे आवाहन
मडगाव नगराध्यक्षपदासाठीचे भाजप गटाचे उमेदवार म्हणून नगरसेवक दामोदर शिरोडकर यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून मंगळवारी ते उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मंगळवारी ते अर्ज भरणार असल्याची माहिती या गटातील नगरसेवकांनी दिली. रविवारी नानुटेल येथे झालेल्या बैठकीला आमदार दिगंबर कामत, माजी आमदार दामू नाईक आणि माजी खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते. सर्वांनी एकसंध राहून पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावे, असे यावेळी नगरसेवकांना सांगण्यात आले. मात्र कोण उमेदवार असेल हे स्पष्टपणे सांगण्यात आले नाही. यावेळी सर्व नगरसेवकांना घेऊन पणजीत नेण्यात आले. तेथे दिगंबर कामत गटातील सगुण नाईक, दामोदर शिरोडकर, लता पेडणेकर, सँड्रा फर्नांडिस, सिद्धांत गडेकर, दामोदर वरक, उपनगराध्यक्षा दिपाली सावळ यांच्यासह गोवा फॉरवर्ड गटातील फुटीर नगरसेवक राजू उर्फ पाकलो नाईक यांचा भाजपात प्रवेश झाला.
आमदार कामत यांच्या गटातील नगरसेवकांचा भाजपात प्रवेश न झाल्याने मूळ भाजपाच्या गटातील सदानंद नाईक यांनी नगराध्यक्षपदावर दावा केला होता. परंतु आता कामत गटातील नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने सदानंद नाईक यांचा दावा टिकणार नसून कामत यांचे जवळचे मानले जाणारे व क्रॉस वोटिंगमुळे घनश्याम शिरोडकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागलेले नगरसेवक दामोदर शिरोडकर हेच मुख्य दावेदार ठरणार आहेत, असे भाजपाचे बहुतेक नगरसेवक खासगीत सांगताना दिसत आहेत. मंगळवारी एकंदर चित्र स्पष्ट होणार असून गोवा फॉरवर्डने निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचे संकेत दिल्याने नगराध्यक्षांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गोवा फॉरवर्ड अलिप्त राहणार : सरदेसाई

दरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या नगरसेवकांच्या क्रॉस व्होटिंगवर टीका करणारे दिगंबर कामत यांचे विधान अत्यंत हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. मडगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यापासून आमचा पक्ष दूर राहील, परंतु गोव्यातील लोकशाहीचा नाश आणि हत्या करणारा अध्यादेश मागे घ्यावा, असे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे.