वृत्त संस्था/ /रिगा (लॅटव्हिया)
येथे सुरू असलेल्या फिडेच्या महिलांच्या ग्रॅण्ड स्वीस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताची ग्रॅण्डमास्टर द्रोणावली हरिकाने 10 व्या फेरीअखेर गुणतक्त्यात संयुक्त तिसरे स्थान मिळविले. हरिकाने 6.5 गुण मिळविले आहेत.
10 व्या फेरीतील सामन्यात जर्मनीच्या एलिझाबेथने हरिकाला बरोबरीत रोखले. या लढतीत हरिकाने विजयाची संधी साधता आली नाही. सिसिलियन पद्धतीचा खेळणाऱया हरिकाला एलिझाबेथवर मात करता आली नाही. दोन्ही खेळाडूंनी 31 व्या चालीअखेर ही लढत बरोबरीत राखण्याचा निर्णय घेतला. हरिका आणि एलिझाबेथ 10 व्या फेरीअखेर प्रत्येकी 6.5 गुणांसह संयुक्त तिसऱया स्थानावर आहेत. चीनच्या लेई तिंगजीने टॉप सीडेड मारिया मुझेचुकला बरोबरीत रोखत गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले. तिच्या खात्यावर 7.5 गुण आहेत. चीनची जिनेरने 7 गुणांसह दुसरे स्थान तर या स्पर्धेतील पाच बुद्धिबळपटूंनी प्रत्येकी समान 6.5 गुणांसह संयुक्त तिसरे स्थान मिळविले आहेत. या स्पर्धेतील शेवटची फेरी बाकी आहे. 10 व्या फेरीतील अन्य सामन्यात भारताचा आर वैशालीला स्टिफेनोव्हाने तसेच पद्मिनीला डॅनीलियानने बरोबरीत रोखले. पुरूषांच्या खुल्या विभागात भारताचा ग्रॅण्ड मास्टर डी.गुकेश, तसेच सुर्यशेखर गांगुली यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले. मात्र रशियाच्या इसीपेंकोने भारताच्या के.शशीकिरणचा पराभव करत पूर्ण एक गुण वसूल केला. या पराभवामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात के. शशीकिरण तसेच निहाल सरीन, पी. हरिकृष्णा व अन्य काही स्पर्धक प्रत्येकी समान सहा गुणांसह संयुक्त चौथ्या स्थानावर आहेत. दहाव्या फेरीअखेर पुरूष विभागात अलीरेजा फिरोजाने 7.5 गुणांसह पहिले स्थान मिळविले असून केरूना आणि ओपेरिन हे प्रत्येकी समान 7 गुणांसह संयुक्त दुसऱया स्थानावर आहेत.