आज 39 आमदारांचा होणार शपथविधी
प्रतिनिधी /पणजी
सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी हंगामी सभापती म्हणून काल सोमवारी शपथ दिली असून ते आज मंगळवार दि. 15 मार्च रोजी होणाऱया विधानसभा अधिवेशनात इतर 39 आमदारांना शपथ देणार आहेत. सकाळी 11.30 वा. पर्वरी येथील विधानसभा संकुलात अधिवेशन बोलावण्यात आले असून मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि सरकारची स्थापना होळीनंतर होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गावकर हे दुसऱयांदा आमदार म्हणून विजयी झाले आहे. हंगामी सभापती म्हणून राज्यपाल पिल्लई यांनी त्यांची निवड केली आहे. आमदारकीची शपथ घेण्यासाठीच हे अधिवेशन बोलावण्यात आले असून आमदारांना शपथ देण्यासाठी गावकर यांना हंगामी सभापती या नात्याने नेमण्यात आले आहे. दोनापावला येथील राजभवनमध्ये गावकर यांचा हंगामी सभापती म्हणून शपथविधी झाला. त्यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.