ढोल-ताशांचा गजर, सासनकाठय़ासह ठिकठिकाणांहून देवदेवतांच्या पालख्याही सहभागी

प्रतिनिधी /बेळगाव
ढोल-ताशांचा गजर, नाचविल्या जाणाऱया विविध सासनकाठय़ा, ठिकठिकाणांहून येणाऱया पालख्या आणि हजारो संख्येने आलेल्या बेळगावकरांच्या उपस्थितीत सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला.
दोन वर्षांच्या खंडानंतर यंद सीमोल्लंघन करण्याचा योग जुळून आल्याने सीमोल्लंघनाची विशेष तयारी करण्यात आली होती. सायंकाळी शहरातील जुन्या 18 गल्ल्यांसह अनेक ठिकाणाचे नागरिक ज्योती कॉलेज मैदानावर एकत्र आले. दुपारी आमदार अनिल बेनके व पंच मंडळींच्या उपस्थितीत चव्हाट गल्ली येथून देवदादा सासनकाठी व मानाची झूल पांघरलेला जोतिबा देवाचा नंदी यांचे पूजन व आरती झाली.
मिरवणूक मार्गस्थ झाली तशी मारुती देवाची पालखी सहभागी झाली. त्यानंतर सासनकाठी व नंदी बसवाण गल्लीत आल्यावर बसवाण्णा देवाचे वाहन मारुती गल्लीतील मारुती मंदिराचे वाहन मिरवणुकीत सहभागी होऊन मिरवणूक सीमोल्लंघन मैदानावर पोहोचली. याच दरम्यान कपिलेश्वर मंदिर, मातंगी मंदिर, समादेवी मंदिर व जोतिबा मंदिराच्या पालख्याही मैदानावर पोहोचल्या. येथे करण्यात आलेल्या आपटय़ांच्या फांद्यांचे रिंगण शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील व अन्य उपस्थितांनी केले. शस्त्र पूजेनंतर रिंगण सोहळा झाला. कटल्या म्हणजे शिवाच्या नंदीने पानांच्या राशीमध्ये आपले शिंग घुसविले आणि त्यानंतर सर्वांनी परस्परांना सोन्याच्या पानांची देवाण-घेवाण करून शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान, यानिमित्त सीमोल्लंघन मैदानावर हजारोंची गर्दी झाली होती. या निमित्ताने विपेत्यांनी वेगवेगळय़ा पदार्थांचे, खेळण्यांचे स्टॉल मांडले होते.
घुमटमाळ मारुती मंदिर परिसरात सीमोल्लंघन उत्साहात
बेळगाव-घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे बुधवारी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. वडगाव, अनगोळ व जुने बेळगाव येथून आलेल्या पालख्यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी व सहकाऱयांनी केले. या उपक्रमात परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून सोने लुटण्याबरोबरच शुभेच्छाही दिल्या.
अनगोळ येथील सीमोल्लंघन घुमटमाळ येथे मोठय़ा उत्साहात पार पडले. अनगोळमधील पालखी वाजत गाजत त्या ठिकाणी नेण्यात आली. त्यानंतर पुजाऱयांनी गाऱहाणे घातल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कॅम्प परिसरात पारंपरिक दसरा
बेळगावमधील कॅम्प परिसरात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. शतकोत्तर परंपरा असणारा कॅम्प येथील दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. कॅम्प येथील मरिअम्मा देवी, कुंती देवी, मरिमाता व दुर्गामाता, लक्ष्मी देवी, तुलकनमा, मुत्तु मरिअम्मा या मंदिरांमध्ये वैशिष्टय़पूर्ण देवीच्या लाकडी मूर्ती आहेत. ब्रिटिश काळापासून या परिसरात दसऱयादिवशी देवींची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक पाहण्यासाठी बेळगावसह परिसरातून शेकडो भाविक दाखल झाले होते. या मिरवणुकीमध्ये सजविलेले वैशिष्टय़पूर्ण रथ पाहण्यासाठी गर्दी झाली होती.