प्रतिनिधी /म्हापसा
झोरवाडा-हणजूण येथील ला वियोला विला परिसरात बुधवारी मध्यरात्री हणजूण पोलिसांनी सापळा रचून घातलेल्या धाडीत तीन लाख वीस हजार रुपयांचा ड्रग्ज जप्त केला. या कारवाईत ड्रग्ज व्यवहारासाठी आलेल्या संशयित हिनाघटा येशुजी(59) रा. झोरवाडा हणजूण या जपानी नागरिकास पोलिसांनी अटक केली.
हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित हिनाघाटी येशुजी ड्रग्ज व्यवसायात गुंतल्याची माहिती खबरींकडून मिळाली होती. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री सापळा रचून संशयित येशुजीची झडती घेतली असता त्याच्याकडे 133 ग्रॅम गांजा आढळला. त्याची बाजारात किंमत अंदाजे वीज हजार असून एक किलो चरस आढळला. चरसची बाजारात किंमत अंदाजे तीन लाख होते. दरम्यान संशयित येशुजी यांचे रद्दबातल ठरलेले पारपत्र पोलिसांनी जप्त केले असून अवैध वास्तव्य तसेच अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताटी रवानगी सध्या हणजूणच्या पोलीस कोठडीत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत देसाई यांनी दिली. हणजूण पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक स्नेहा सावळ, निरीक्षक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.