जन्मजात आजारपणामुळे किंवा अपघातानंतर व्हील चेअरवरचं आयुष्य नशीबी आलं म्हणजे सगळं संपलं असं नाही. आपण आयुष्यात खूप काही करू शकतो. सगळी स्वप्नं फक्त दोन पायांवर उभं राहूनत साकारायची नसतात. अंजूरानी जॉयने हे सिद्ध केलं आहे. अंजू अष्टपैलू आणि हरहुन्नरी आहे.
अंजूरानी जॉय… हे नाव तसं आपल्याला अपरिचितच. केरळमधल्या एर्नाकुलमची रहिवासी असणारी अंजूरानीने जार लिफ्टिंगमध्ये विश्वविक्रम केला आहे. ती कलाकार आहे. मॉडलिंग करते. उद्योजिकाही आहे. समाजकार्यातही ती आघाडीवर असते. अंजूरानीने आयुष्याशी कोणतीही तडजोड केली नाही. व्हील चेअरवरचं आयुष्य नशीबी आलं म्हणून रडतही बसली नाही. तिने आयुष्य हसतखेळत जगायचं ठरवलं. अंजूला पेराप्लेजिया नामक आजार आहे. या आजारात मेंदू आणि पाठीच्या कण्यावर परिणाम झाल्याने शरीराचा खालचा भाग अधू होतो आणि व्हीलचेअरशिवाय पर्याय उरत नाही. अंजूरानी 31 वर्षांची आहे. ती दोन्ही हातांनी लिहू शकते. परमेश्वराने तिला अपंगत्वासोबतच अनेक गुणही दिले. याच गुणांच्या बळावर ती आयुष्य जगते आहे.
अंजूरानी दागिने बनवते आणि त्यांची ऑनलाईन विक्री करते. यातून तिला चांगलं उत्पन्न मिळतं. परिस्थितीमुळे ती कधीही खचली नाही. उलट अनेकांसाठी प्रेरणास्थान बनली. थनल या पेराप्लेजिक सोसायटीची ती सदस्य आहे. देशात व्हीलचेअर आर्टिस्टच्या कलागुणांना वाव देण्यासाठी छाया हा उपक्रम राबवला जातो. अंजूरानी छायाचा एक भाग आहे. ती बर्याच फॅशन शोमध्ये सहभागी झाली असून दोन दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत. ती पलावी प्लस यू टय़ूब वाहिनीची मीडिया डायरेक्टर आहे.
या प्रवासात अंजूला तिच्या पालकांची साथ मिळाली. तिने चौथीपर्यंत शाळेत शिक्षण घेतलं. वडील तिला शाळेत सोडायला जात. मात्र त्यानंतर शाळा खूप लांब असल्यामुळे अंजूने घरूनच शिक्षण पूर्ण केलं. तिने समाजशात्र हा विषय घेऊन पदवी मिळवली आहे. अंजूने टीवीवर जार लिफ्टिंगची स्पर्धा बघितली. त्यानंतर तिला यात रस निर्माण झाला. मग तिने दोन्ही हातांनी जार उचलण्याची कला आत्मसात केली. ती एक किलो वजनाचे जार बोटांनी अगदी सहज उचलू शकते आणि मिनिटभरापेक्षा अधिक काळ धरूनही ठेऊ शकते. आता तर ती दोन किलोचे जार उचलू लागली आहे. अंजू आपली ही कला विकसित करते आहे. या अष्टपैलू अंजूचं सगळे जण खूप कौतुक करतात. आईवडिलांनाही तिचा खूप अभिमान वाटतो. अंजूला अपंगांसाठी आश्रम स्थापन करायचा आहे. दिव्यांगांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलावा यासाठी ती प्रयत्नशील आहे. या क्षेत्रात तिला बरंच काम करायचं आहे. अंजूला आयुष्य भरभरून जगायला आवडतं. तर अशी ही अंजू तुम्हाआम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल.