वृत्तसंस्था/ चंदीगड
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे हरियाणा सरकार नवा ‘कोरोना कायदा’ करणार आहे. आता राज्यभरात सामाजिक अंतर राखणे, मास्कशिवाय घराबाहेर पडणे आणि सार्वजनिक जागी थुंकण्यास मनाई अशा कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नव्या कायद्यानुसार, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाबाबत कायदा करण्यासाठी अधिकाऱयांना तातडीने निर्देश देण्यात आले आहेत. सरकार याबाबत लवकरच अधिसूचना जारी करणार आहे. राज्यभरात जे कोरोना योद्धा आपत्कालीन परिस्थितीत महामारीशी लढत आहेत, त्यांच्यावर हल्ला झाल्यास गय करण्यात येणार नाही. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती हरियाणाचे गृह आणि आरोग्य मंत्री अनिल वीज यांनी सांगितले.
सर्वतोपरी प्रयत्न सुरू
गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार, कोरोनाबाधितांच्या शोधासाठी संशयितांची तपासणी करण्यात येणार आहे. एक लाखापेक्षा अधिक लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, उर्वरित नागरिकांचे स्वॅब घेण्यात येत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.