तालुक्मयाच्या विविध भागातही चोरटा व्यवसाय सुरूच : वनखात्याचा आशीर्वाद असल्याची चर्चा, अधिकाऱयांचे कारवाईकडे दुर्लक्ष
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपशाला पुन्हा ऊत आला आहे. मलप्रभा नदीला जोडणाऱया हलात्री नदीसह अनेक उपनद्या तसेच नदीवर मोठय़ा प्रमाणात तांत्रिक बोटीद्वारे वाळू उपशा सुरू आहे. त्यामुळे हलात्रीसह अनेक नाल्यातील दूषित पाणी जनावरांच्या आरोग्याला घातक ठरत आहे. शिवाय शेतवडीतील उन्हाळय़ातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. हालात्रीतील दूषित पाणी मलप्रभा नदीच्या पात्रात जावून खानापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱया मुख्य जॅकवेल परिसरात पाणी मिसळत आहे. याकरिता हलात्री नदीवरील बेकायदेशीर वाळू उपशावर सार्वजनिक बांधकाम खाते व महसूल खाते बंदी आणणार काय, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.
मागीलवषी मलप्रभा नदीवरील लीजप्रमाणे वाळू उपशासाठी परवाने देण्यात आले. पण पट्टा जमिनीतील वाळू उपशाला आजतागायत परवाना देण्यात आला नाही. असे असताना खानापूर तसेच नंदगड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येणाऱया अनेक गावात हा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. कोरोनाकाळात वाळू वाहतुकीचा व्यवसाय खंडित पडला होता. पण तरीही काही भागात चोरटी वाहतूक सुरूच होती. आतातर गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये पुन्हा वाळू उपशाला उधाण आले आहे. चोरटा वाळू व्यवसाय आता शेतकऱयांच्या मुळावर पडत असून याला राजकीय वरदहस्ताखाली वनखात्याचा तसेच पोलीस खात्याचा याकडे कानाडोळा केल्याचीही चर्चा आहे. परंतु वाळू उपशामुळे नदी-नाल्यांची दुरवस्था होत आहे.
राज्य शासनाकडून बेकायदेशीर वाळू उपशावर निर्बंध आणले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तांत्रिक बोटीद्वारे किंवा नदी-नाल्यातील वाळू उपशाला निर्बंध आहेत. तालुक्यातील ठराविक भागातच वाळू उपशाला परवाना आहे. परंतु तालुक्यातील काही ठेकेदार हा वाळू व्यवसाय राजरोसपणे करत आहेत. तालुक्मयाच्या गर्लगुंजीपासून नंदगड, बिडीपर्यंत तसेच वनखात्याच्या हलसालपासून माडीगुंजी भागातील प्रदेशात हा चोरटा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. पण सार्वजनिक बांधकाम व महसूल खाते केवळ कारवाईचे नाटक करत पुन्हा वाळू उपशा करणाऱया ठेकेदारांना शह देण्याचा प्रयत्न करत आहे.
उपनदीची दिशाच बदलली
या पूर्वी हलात्री नदीचे पात्र केवळ 50 ते 80 फूट रुंद होते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीत या नदीच्या पात्रात व काठावर होणारा वाळू उपशा पाहता या उपनदीची दिशाच बदलली आहे. पोलीस खात्याच्या हप्तेवारीमुळे अनेक वाळू ठेकेदार चोरटय़ा मार्गाने व्यवसाय करतच आहेत. बेकायदेशीर वाळू उपशामुळे दुष्काळी परिस्थितीला अधिकच खतपाणी घालण्याचा प्रकार होत आहे. मोठय़ा प्रमाणात झालेल्या वाळू उपशामुळे जमिनीतील पाण्याचा स्त्रोत पूर्णपणे खालावल्याने नदी-नाले, विहिरी कोरडे पडत आहेत. यामुळे उन्हाळय़ात भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ ओढवत आहे.
वाळू उपसा आता शेतकऱयांच्याच मुळावर
तालुक्याच्या अनेक भागात पट्टा जमिनीमध्ये अनेक शेतकरी वाळू ठेकेदाराना जमिनी देऊन वाळू उपशा करण्यास वाव देत आहेत. असाच वाळूउपसा कायम सुरू राहिल्यास पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ शेतकऱयांवर येणार आहे. शिवाय पिकाऊ जमिनीतील वाळू मिश्रीत मातीसह जमिनीतील क्षारयुक्त अर्द्रताच नष्ट झाल्याने दुष्काळी परिस्थितीला भाविष्यात सामोरे जावे लागणार आहे. तालुक्यातील हलात्री, पांढरी, या उपनद्यांच्या पात्रात व पात्राच्याबाहेर गेल्या दीड-दोनवर्षात झालेली मोठी वाळू उपशा आता शेतकऱयांच्याच मुळावर येऊन ठेपली आहे.
येथील नद्या, उपनद्या व नाल्यांचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. याचबरोबर यालगत असलेल्या शेत जमिनीचेही अस्तित्व नष्ट झाल्याने शेतकऱयांना शेतीची सरहद्द शोधावी लागत आहे.
8 ते 10 तांत्रिक बोटीद्वारे वाळू उपशा
महिन्याभरापूर्वी हलसाल भागातील वनखात्याच्या अखत्यारित नाल्यावर होणाऱया वाळू उपशावर कारवाई करण्याचे नाटक करण्यात आले. आता पुन्हा तालुक्मयातील विविध नाल्यावर तसेच हलात्री नदी परिसरात होत असलेल्या या वाळू उपशावर शासनाने अलीकडच्या काळात कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे या भागात जवळपास 8 ते 10 तांत्रिक बोटीद्वारे मोठय़ा प्रमाणात वाळू उपशा होत आहे. तालुक्यातून जाणाऱया मलप्रभा नदीनंतर प्रामुख्याने हलात्री नदीला उपनदीचा दर्जा दिला जातो. परंतु या नदीवर वाळू उपशामुळे हलात्री नदीचे अस्तित्वच नष्ट झाल्याचे दिसून येत आहे.