पुलाची शिरोली/वार्ताहर
हातकणंगले पंचायत समिती सभापती महेश पाटील यांनी बुधवारी आपल्या पदाचा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचेकडे राजीनामा दिला.
हातकणंगले पंचायत समितीमध्ये आमदार प्रकाश आवाडे, आमदार डॉ. विनय कोरे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाची सत्ता आहे. गेल्या वर्षी आमदार आवाडे गटाचे चंदूर येथील महेश पाटील यांना संधी मिळाली आहे. यावेळी रोटेशन पध्दतीने सभापती पदाची संधी देण्याचे सर्वानुमते ठरले होते. त्या अनुषंगाने पाटील यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमन मित्तल यांचेकडे राजीनामा सादर केला आहे.
सध्या आवाडे गटाचे सहा, महाडिक (भाजप) गटाचे सहा व कोरे गटाचे पाच असे मिळून २२ पैकी १७ सदस्य आहेत. तर शिवसेना दोन, शेतकरी संघटना दोन व राष्ट्रीय काँग्रेस एक असे पाच सदस्य आहेत.
आवाडे महाडिक व कोरे गट एकञीत आल्यास कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला यश मिळणार आहे.गेल्या वर्षी सभापती निवडीवेळी ठरलेल्या निर्णयानुसार निवड करण्यासाठी एकमत झाल्यास महाडिक (भाजप) गटाच्या डॉ. सौ. सोनाली पाटील यांना संधी मिळेल असे बोलले जात आहे.