मशिदीलाच केले कोविड सेंटर
देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. लोकांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. अशा स्थितीदरम्यान गुजरातच्या वडोदरातून एक चांगली बातमी समोर आली आहे. येथील एका मशिदीलाच कोविड सेंटर करण्यात आले आहे. गुजरातमध्येही कोरोनाचा संसर्ग बळावला आहे. रुग्णालयांवर प्रचंड ताण असून तेथे बेडसह अन्य सुविधांचा तुटवडा भासू लागला आहे.
रुग्णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहून प्रशासनही हतबल झाले आहे. बेड आणि ऑक्सिजनसाठ लोकांना झगडावे लागत आहे. अशा स्थितीत वडोदरातील जहांगीरपुरा मशिदीतून एक चांगला पुढाकार घेण्यात आला आहे. या मशिदीलाच कोविड सेंटरमध्ये रुपांतरित करण्यात आले आहे.

जहांगीरपुरा मशिदीत 50 पेक्षा अधिक बेड लावण्यात आले आहेत. रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध न होणाऱया रुग्णांवर येथे उपचार होत आहेत. ऑक्सिजन आणि बेडच्या तुटवडय़ामुळे आम्ही याला कोविड सुविधा केंद्रात बदलेले आहे. रमजानमध्ये हे सत्कार्य करण्यापेक्षा आणखी चांगले काय असेल असे उद्गार मशिदीच्या विश्वस्तांनी काढले आहेत.