भाविकांच्या स्वागतासाठी ग्रामस्थ सज्ज : रथ मिरवणुकीने होणार यात्रेला प्रारंभ
वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा येथे मंगळवार (दि. 16) पासून होत असलेल्या ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी येणाऱया भाविकांच्या स्वागतासाठी हिंडलगा ग्रामस्थ सज्ज झाले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरा देवीचा हळदी समारंभ व विधिवत कार्यक्रम पार पडले तर सकाळी 6.47 वा. शुभमुहूर्तावर अक्षतारोपण झाल्यानंतर रथ मिरवणुकीने यात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे.
गावात तब्बल शंभर वर्षांनंतर श्री महालक्ष्मी देवीची भव्य प्रमाणात यात्रा होत असल्याने सर्वत्र चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण गाव, मंदिरे आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आली आहेत. तर ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लावून यात्रेला येणाऱया भाविकांचे स्वागत करण्यात आले आहे. सकाळी अक्षतारोपण झाल्यानंतर श्री लक्ष्मी मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ होणार आहे. तेथून धनगरी ढोल आणि ढोलपथकाच्या साक्षीने सवाद्य मिरवणूक मरगाई गल्लीमार्गे वेंगुर्ला रोड परिसरातून निघणार आहे. त्यानंतर सूर्यास्तापूर्वी आंबेवाडी क्रॉसजवळ रथ मिरवणूक थांबविण्यात येणार आहे. तर बुधवारी (दि. 17) पुन्हा सकाळी 8 वाजता मिरवणुकीला सुरुवात करून दुपारी 2 वाजता पर्यंत देवी गदगेवर विराजमान होईल. त्यानंतर मानाचा नैवेद्य दाखवून विधीपूर्वक ओटी भरण्याच्या कार्याला प्रारंभ होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांची उपस्थिती राहणार असल्याने परिसरात खेळणी, विपेते, पाळणे आदी मनोरंजनासाठी व्यापारी देखील मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे बालकांसह महिला व नागरिकांचे मनोरंजन होणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव संघाने योग्य ती खबरदारी घेतली असून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून यात्रा साजरी करण्याचे आवाहन संघामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. शिवाय यात्रा काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी बेळगाव ग्रामीण, एपीएमसी, कॅम्प व काकती पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तर गावामध्ये वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे पार्किंगच्या ठिकाणीच वाहने लावण्याचे आवाहन यात्रोत्सव संघामार्फत करण्यात आले आहे.
श्री लक्ष्मीदेवीसाठी 12 ग्रॅम सोन्याचा हार अर्पण

यात्रेनिमित्त सोमवारी रक्षक कॉलनी, पाईपलाईन रोड, एमईएस कॉलनी, डिफेन्स कॉलनी परिसरातील रहिवाशांनी वर्गणीतून देवीसाठी बनविलेला 12 ग्रॅम सोन्याचा लक्ष्मीहार यात्रोत्सव संघाच्या पदाधिकाऱयांकडे सुपूर्द केला. यावेळी संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे, सेपेटरी प्रकाश बेळगुंदकर, सदस्य राजू कुप्पेकर, श्रीकांत जाधव, भरमा कुडचीकर यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य डी. बी. पाटील, रेणुका भातकांडे, माधवी हरेर, वनिता पाटील, नयन शिंदे, तनुजा गावडा, वीणा पाटील, बी. एल. पाटील, बळवंत झेंडे, अरुण हरेर, सुमन मुगळीकर, शंकर पाटील, प्रवीण पाटील, नंदा हरेर व परिसरातील भाविक उपस्थित होते.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांची भेट

सोमवारी (दि. 15) बेळगाव ग्रामीणच्या आमदार व श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाच्या कार्याध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यात्रास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच हेस्कॉम, अग्निशमन दल, पोलीस खाते, पाणीपुरवठा मंडळ व इतर संबंधित खात्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून यात्रेदरम्यान संपूर्ण सहकार्य करण्याची सूचना केली. तसेच कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता शांततेत यात्रा साजरी करण्याचे आवाहन हेब्बाळकर यांनी केले.