सध्या एका जुन्या वादाला नव्याने तोंड फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा वाद हिंदुत्व आणि हिंदू असा आहे. राजस्थानातील काँगेसच्या एक जाहीर सभेत काँगेसचे सध्या पदावर नसलेले पण प्रमुख नेते राहुल गांधी यांनी ‘भारतात सध्या ‘हिंदुत्व’वाद्यांचे राज्य आहे. आपल्याला देशात ‘हिंदुं’चे राज्य परत आणायचे आहे, असे विधान केले. तसेच महात्मा गांधी हे हिंदू होते, पण नथुराम गोडसे हा हिंदुत्ववादी होता, अशी टिप्पणीही त्यांनी केली. हिंदुत्ववादी सरकार महागाई वाढवत आहे, असे प्रतिपादन करत त्यांनी हा वाद अर्थकारणाशीही जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणातील बराच वेळ त्यांनी हिंदुत्व आणि हिंदू यावर बोलण्यात व्यतीत केला आणि 53 वेळा त्यांनी या शब्दांचा उच्चार केला असेही प्रसिद्ध झाले आहे. भारतातील सर्वात जुन्या, स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांहून अधिक काळ सत्तेवर राहिलेल्या आणि स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवून घेणाऱया राजकीय पक्षाच्या प्रमुखाने हा वाद उकरुन काढल्याने त्याचा उहापोह करणे भाग पडते. हिंदुत्व आणि हिंदू हा वाद प्रथमच निर्माण झालेला नाही. पूर्वीही यावर अनेक विचारवंतांनी त्यावर भाष्य केलेले आहे. तथापि, कोणीही आजवर हिंदुत्व, हिंदू आणि त्यांच्यातील अंतर किंवा फरक नेमक्या शब्दांमध्ये स्पष्ट केलेला नाही. राहुल गांधींनीही त्यांच्या भाषणात त्यांच्या दृष्टीने हिंदू म्हणजे कोण, हिंदुत्ववादी म्हणजे कोण आणि हिंदुत्व आणि हिंदू या दोन संकल्पनांमध्ये विरोध नेमका कोणता हे स्पष्टपणे प्रतिपादन केलेले नाही. तथापि, एकंदरीत त्यांना जे म्हणायचे आहे, ते असे असावे की जे जे ‘चांगले’ ते ते हिंदू आणि जे जे ‘वाईट’ ते ते हिंदुत्व. राहुल गांधींना अभिप्रेत असणारा त्यांच्याच वक्तव्याचा अर्थ जर हाच असेल तर त्यामुळे बराच गोंधळ निर्माण होणार आहे. कारण ‘चांगले’ आणि ‘वाईट’ हे बऱयाच बाबींमध्ये सापेक्ष असते. सापेक्ष याचा अर्थ असा की एका व्यक्तीसाठी जे चांगले आहे, ते दुसऱया व्यक्तीसाठी ‘वाईट’ असू शकते. अशावेळी या दोन्ही व्यक्तींपैकी हिंदू कोण आणि हिंदुत्ववादी कोण हे कसे आणि कोण ठरविणार? उदाहरणार्थ, 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 2014 पेक्षाही जास्त जागा आणि मते मिळवून पुन्हा बहुमतात आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलग दुसऱयांदा संधी मिळाली. पंतप्रधान मोदी हे राहुल गांधी यांच्या दृष्टीने ‘हिंदुत्व’वादी आहेत. मग ज्या साधारणतः 23 कोटी मतदारांनी ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून मतदान केले ते मतदार हिंदू की हिंदुत्ववादी? जो महागाई वाढवतो तो हिंदुत्ववादी असे म्हणायचे तर नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहनसिंग हे सर्व पंतप्रधान हिंदुत्ववादी ठरतात. कारण या प्रत्येकाच्या कार्यकाळात महागाई वाढलेलीच आहे. ती केवळ पंतप्रधान मोदींच्याच काळात वाढलेली आहे असे नव्हे, हे सर्वजण जाणतात. याचाच अर्थ असा की ज्या राहुल गांधींना ‘हिंदू’चे राज्य परत आणायचे आहे, त्यांच्याच पक्षाने आतापर्यंत देशाला दिलेले सर्व पंतप्रधान ‘हिंदुत्व’वादीच होते असे म्हणावे लागते. काँगेस पक्षाचा सहभाग ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये आहे, त्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील राज्यांचा कर कमी न केल्याने महाराष्ट्रात पेट्रोल कर्नाटक आदी राज्यांच्या तुलनेत 8 रुपयांनी महाग आहे. मग पेट्रोलच्या महागाईच्या संदर्भात काँगेसचा सहभाग असलेले महाराष्ट्र सरकार ‘हिंदुत्व’वादी आहे काय? तसे असल्यास महाराष्ट्रात काँगेसही हिंदुत्ववादी आहे असे म्हणावे लागते. याच महाराष्ट्र सरकारने विदेशी बनावटीच्या दारुवरील उत्पादन शुल्क (एक्साईज डय़ूटी) कमी करुन ती दारु मात्र स्वस्त केली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या हिंदुत्व आणि हिंदू यांच्या व्याख्येप्रमाणे पेट्रोलच्या संदर्भात ‘हिंदुत्व’वादी असणारे महाराष्ट्र सरकार विदेशी दारुच्या संदर्भात मात्र पक्के ‘हिंदू’ आहे, असाही अर्थ निघू शकेल. आणखी काही उदाहरणे देता येतील. काही व्यक्ती देव मानतात, तर काही मानत नाहीत. या दोन्ही गटातील व्यक्ती एकमेकांना ‘वाईट’ समजतात किंवा एकमेकांची खिल्लीही उडवतात. मग त्यांच्यापैकी हिंदू कोण आणि हिंदुत्ववादी कोण ? या प्रश्नाचे उत्तर काय आहे ? तेव्हा राहुल गांधींना नेमके काय म्हणायचे आहे, हे त्यांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांने स्पष्ट करावयास हवे. त्यांचे हे भाषण लोक किती गांभीर्याने घेतील हा भाग वेगळा असला तरी राहुल गांधी यांचे महत्व लक्षात घेता त्यांच्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट होणे आवश्यक आहे. वास्तविक हिंदू आणि हिंदुत्व यामध्ये कोणतेही अंतर नाही. बाबा रामदेव यांनी याच संदर्भात ‘व्यक्ती’ आणि ‘व्यक्तीमत्व’ यात काय अंतर असते असा प्रश्न विचारला आहे. ‘पुरुष’ आणि ‘पुरुषत्व’, ‘स्त्री’ आणि ‘स्त्रीत्व’, ‘देव’ आणि ‘देवत्व’ आदी शब्द जसे आहेत, तसेच हिंदू आणि हिंदुत्व हे शब्द आहेत. त्यामध्ये अंतर असल्याचे दर्शविणे हे नाकाने कांदे सोलण्यासारखे किंवा इंग्रजीमध्ये ज्याला ‘हेअर स्प्लिटींग’ म्हणतात तसे केल्यासाखे निरर्थक आणि निरुपयोगी आहे. पण राजकीय नेत्यांना असे वाद निर्माण करुन लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची सवय असते. यातून राजकारण फारसे साध्य होत नाही. पण काहीतरी बोलल्याचे समाधान मिळते. मध्यंतरीच्या काळात अशाच प्रकारे ‘जानवे’, ‘गोत्र’ आणि ‘ब्राम्हणत्व’ यांचाही राजकीय उपयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचा फारसा प्रभाव पडत नाही, असे अनुभवास येताच आता हिंदुत्व आणि हिंदू आदी शब्दांचा उपयोग होत आहे. तथापि, लोक आता पूर्वीप्रमाणे ‘भोळे’ राहिलेले नाहीत. त्यामुळे या शब्दांच्या राजकीय जंजाळात ते स्वतःला अडकवून घेत नाहीत, असे दिसून येते. राजकीय नेत्यांना याचे भान आवश्यक आहे. कित्येकदा ते ठेवले जात नाही. संपूर्ण समाजाची अशी विभागणी ‘हिंदुत्ववादी आणि हिंदू’ अशा दोनच श्रेणींमध्ये करायची ठरविल्यास ‘धर्मनिरपेक्षता’ म्हणजे नेमके काय हा प्रश्नही उपस्थित होईल. सर्व पक्षीय राजकारण्यांनी आता नवे प्रश्न निर्माण करण्यापेक्षा आहेत ते सोडविण्याकडे लक्ष द्यावे, एवढीच अपेक्षा.
Previous Articleसाडेपाच लाख लोकांनी घेतला पहिला डोस
Next Article मैदानावर येण्याआधी तंबूत जाण्याची भीती
Related Posts
Add A Comment