घरोघरी होणार गुढीरोहण सार्वजनिक ठिकाणीही सोहळे
प्रतिनिधी / पणजी
आज चैत्रशुद्ध प्रतिपदा. प्लवनाम सवंत्सराला आज प्रारंभ होतोय. चैत्र पाडवा म्हणून ओळखल्या जाणाऱया या उत्सवाला गुढीपाडवा तसेच संसारपाडवा म्हणूनही संबोधले जाते. आज हिंदूंच्या रिती रिवाजानुसार परंपरेनुसार व प्रथेनुसार, शास्त्रानुसार नूतन वर्षाला प्रारंभ होत आहे.
वसंत ऋतू सुरु झालेला असून आजपासून पवित्र चैत्र महिन्याला प्रारंभ होत आहे. या मासाचे एक वैशिष्टय़ म्हणजे हिंदूचे हृदयस्थान असलेल्या प्रभू श्रीरामाचा जन्म आणि रामाचा आदर्श सेवक असलेल्या हनुमंताचाही जन्म याच महिन्यात आहे. चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामनवमी उत्सव साजरा केला जातो. पौर्णिमेला पहाटे हनुमान जयंती होते. देशातील अनेक भागात या दोन मोठय़ा उत्सवाच्या दरम्यान, चैत्रोत्सव साजरा करण्याची दीर्घ परंपरा आहे. प्रभू श्री रामाचा जन्म देखील याच महिन्यात झालेला असल्याने या मासाला ‘पुरुषोत्तम मास’ म्हणूनही देशात ओळखले जाते.
गुढी पाडव्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम
हिंदू धर्मियांच्या आजच्या या पवित्र दिनी राज्यातील विविध मंदिरांमध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिमगोत्सवाची सोमवारी सांगता झाल्यानंतर आज नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे स्वागत कडुलिंबाच्या पाल्याची कडू आणि किंचित तिखट व आंबट मिश्रणाच्या आयुर्वेदिक चटणी प्राशनाने होते. प्रत्येक हिंदू धर्मिय आज घरावर गुढी उभारुन नूतन वर्षाचे स्वागत करणार आहे. तसेच दारावर तोरण बांधून आणि महिलावर्गातर्फे आज घरासमोर रांगोळीने युक्त असे चैत्रांगण काढून सर्व देवदेवतांचे स्मरण करण्याची प्रथा व परंपरा पिढीजात गोमंतकीय आजही पाळत आहेत. आज गुढीपाडव्या निमित्ताने विविध मंदिरांतून देवदेवतांच्या पालख्या, पारंपरिक मंदिरातून देवीचे कलश घरोनघरी जातात व त्यांची पूजाअर्चा केली जाते. राज्यातील या मोठय़ा सोहळ्य़ाची तयारी जनतेने केली असून सारी जनता आज नववर्षाच्या स्वागतास सज्ज झाली आहे.