ऑनलाईन टीम / तरुण भारत
गेले काही दिवसांपासुन कर्नाटकसह देशभर वादाचे अऩेक प्रसंग निर्माण करणाऱ्या हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल देत हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे स्पष्ट करत कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या होत्या. त्यामुळे या निकालावर अऩेक अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. अशा प्रकारे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील हिजाब बंदीवर निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
हिजाब बंदीचा निकाल देणाऱ्या त्रिसदस्यीय खंडपीठामधील सदस्य तथा कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी यांना ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. तसा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अॅड. उमापती एस यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार उमापती यांनी तक्रारीत न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर आल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये झारखंडमधील न्यायाधीशांच्या खुनाचा संदर्भ देण्यात आलाय. पहाटे मॉर्निग वॉकसाठी गेल्यानंतर या न्यायाधीशांचा खून करण्यात आला होता. अगदी अशाच पद्धतीने कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अवस्थी यांचा खून करण्याची धमकी या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे, असे तक्रारदारने म्हटले आहे.